इचलकरंजीतून बांधकाम कामगारांच्या साहित्याचे वाटप करण्याची मागणी….

सरकारकडून अनेक नवनवीन योजना, उपक्रम राबविले जातात जेणेकरून त्याचा सर्वसामान्य जनतेला लाभ होईल. या योजनांपैकी एक योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना. शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी क्षेत्रातील बांधकाम कामगारांसाठी आवश्यक संच (पेटी) व गृहोपयोगी वस्तू (भांडी) इचलकरंजी येथे मिळावी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ऑडिट ताबडतोब व्हावे. मंडळाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या ठेकेदारांची चौकशी व्हावी, या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेसह विविध कामगार संघटनांच्यावतीने सरकारी कामगार अधिकारी राहुल तोडकर यांना देण्यात आले. 

बांधकाम कामगारांसाठी हाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना झाली आहे. या मंडळाच्या वतीने विविध योजना सुरू आहेत. त्यापैकी अत्यावश्यक संच (पेटी), गृह उपयोगी वस्तू (भांडी) यांचे वाटप कोल्हापूर येथे होते. यामुळे शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी येथील बांधकाम कामगारांची प्रचंड गैरसोय होत आहे. इचलकरंजीकरिता स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आहे.

पण ठेका कोल्हापूर येथे दिला जातो, तसे न होता याच विभागात सर्व वाटप सुरू व्हावे, शिष्यवृत्तीची प्रलंबित कामे ताबडतोब निकाली लावावी, २०२१ पासून मंडळाचे ऑडिट झाले नाही ते ताबडतोब व्हावे, या मागण्यांचे निवेदन आज देण्यात आले. यावेळी राजेंद्र निकम, कॉ. भरमा कांबळे, कॉ.आनंदा गुरव, मदन मुरगुडे, महेश लोहार, प्रवीण बनसोडे, बापु कांबळे, रमेश खोत, राहूल कडगावे आदी उपस्थित होते.