सोशा कॅफेचालकाचा जीव घेतला, संशयित आरोपीनेही आयुष्य संपवलं

अंबाझरीतील सोशा कॅफेचालक अविनाश (Sosha cafe) भुसारी हत्याकांडातील संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिचभवन परिसरात उघडकीस आली. अबू ऊर्फ आभास महेश क्षीरसागर (वय 26, रा. रामनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अबूच्या आत्महत्येचे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. त्याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

नेमकं काय झालं?

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तीन वाजता अबू हा चिचभवन येथे राहणाऱ्या मावशीकडे गेला. लघुशंकेला जात असल्याचे सांगून तो पहिल्या माळ्यावर गेला. स्नानगृहात न जाता तो खोलीत गेला. दरवाजा बंद करून पंख्याला दोरी बांधली व गळफास घेतला. अबू न परतल्याने नातेवाइक पहिल्या माळ्यावर गेले. दरवाजा बंद होता. नातेवाइकांनी दरवाजा ठोठावला. त्याने प्रतिसाद दिला नाही. नातेवाइकांनी दरवाजा तोडला असता अबू गळफास लावलेला दिसला. नातेवाइकांनी फास काढून त्याला एम्समध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

शेखू याने अविनाश भुसारी व त्याच्या साथीदारांच्या मदतीने पवन हिरणवार व बंटी हिरणवारच्या हत्येचा कट आखला. याबाबत अविनाश याने अबूला माहिती दिली. ही माहिती अबूने बंटी याला दिली. त्यामुळे बंटी संतापला होता. याच दरम्यान खापरखेड्यात शेखू व त्याच्या टोळीने गोळीबार केला. यात पवन हिरणवार याचा मृत्यू झाला, तर बंटी हा जखमी झाला होता. पवनच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पवन याने प्रवेश व त्याच्या साथीदारांच्या हत्येचा कट आखला. 14 एप्रिलला दोघेही त्याला सापडले नाहीत. 15 एप्रिलला अविनाश हा कॅफेसमोर उभा असल्याचे बंटीला दिसले.

अबू याला अविनाशने हत्या होणार असल्याचे सांगितले होते, असे बंटीच्या लक्षात आले. त्यामुळे बंटी व त्याच्या साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून अविनाशची हत्या केली. अविनाशच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी बंटी व त्याच्या साथीदारांना अटक केली. चौकशीदरम्यान अबूचे नाव समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली. सूचनापत्र देऊन त्याला सोडले.

अविनाशच्या खुनात आपल्याही अटक होईल, अटक झाली नाही तर अविनाश भुसारी याची टोळी आपल्याला ठार मारेल, अशी भीती अबूला वाटायला लागली. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला.