पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील (BJ Medical College) द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीने काल (मंगळवारी, ता, 5) रात्री वसतिगृहातील एका खोलीमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
ज्योती कृष्णकुमार मीना असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ज्योती ही मूळची राजस्थान येथील आहे. ती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती . ती कॉलेजच्या वसतिगृहामध्ये राहत होती. मंगळवारी रात्री तिने एका मोकळ्या खोलीमध्ये गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. घटनेची माहिती समजताच सहकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे.
बी जे वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेऊन डॉक्टर होऊ पाहणाऱ्या ज्योती कृष्णकुमार मीनाने मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याची माहिती आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीतच तिने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने खळबळ उडाली . मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घटना उघडकीस आली. ज्योतीला मानसिक आजाराची ट्रीटमेंट सुरु होती, अशीही माहिती आहे. सुसाईड नोटमधून तिच्या आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झाला आहे. आई-वडिलांची माफी तिने त्या चिठ्ठीतून मागितली आहे. मला शिकायचे आहे, पण माझ्याकडून होत नाहीये, मला माफ करा, असं म्हणत तिने आई-वडिलांना उद्देशून माफी मागणारा मजकूर शेवटच्या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर तिचा भाऊ राजस्थान येथून थोड्या वेळापूर्वीच पुणे शहरात दाखल झाला आहे. दरम्यान, मृत तरूणीची मानसोपचार तज्ञांची ट्रीटमेंट सुरु होती, अशी माहिती मिळत आहे. तिच्या काही औषध-गोळ्या देखील सुरु होत्या. विद्यार्थिनी आठवीत असल्यापासूनच मानसिक रुग्ण होती. काही दिवसांपूर्वी तिने टक्कलही केल्याची माहिती समोर आली आहे.
