उच्च रक्तदाब ही केवळ प्रौढांमधील समस्या राहिलेली नाही. सध्या, मोठ्या संख्येने तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचे निदान होत आहे, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो. याकरिता उच्च रक्तदाब नियंत्रित करून हृदयाच्या समस्या टाळणे गरजेचे आहे. या लेखाच्या माध्यमातून रक्तदाब आणि हृदयविकार यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करुन हृदयांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स देण्यात आल्या आहेत.
उच्च रक्तदाबाला अनेकदा “सायलेंट किलर” म्हणून संबोधले जाते कारण यामध्ये कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत आणि कालांतराने हृदयाचे नुकसान होते. म्हणूनच २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढतो. उच्च रक्तदाबाचा हृदयावर कसा परिणाम होतो हे समजून घेऊन आणि त्याचे व्यवस्थापन केल्यास हृदय निरोगी राखता येते.
उच्च रक्तदाब आणि हार्ट फेल्युअर
रक्ताभिसरण प्रणालीत रक्त वाहताना धमनीच्या भिंतीवर जास्त दाब पडल्यास उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. कालांतराने, हा दाब हृदयाला रक्त पंप करण्यासाठी सामान्यपेक्षा जास्त काम करण्यास भाग पाडतो. सततच्या उच्च दाबामुळे हृदयाचे लेफ्ट व्हेंट्रिकल जाड होते, ज्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते. वाढलेल्या ताणामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होऊन, रक्त कार्यक्षमतेने पंप करण्याची हृदयाची क्षमता कमी होते. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे त्यांची लवचिकता कमी होते आणि ब्लॉकेजेस होण्याचा धोका वाढतो,ज्यामुळे हृदयावर आणखी ताण येतो. हृदय कमकुवत झाल्यामुळे, ते आवश्यकतेनुसार रक्त पंप करू शकत नाही, ज्यामुळे फुफ्फुसे, पाय आणि इतर अवयवांमध्ये द्रव जमा होतो आणि एखाद्याला हार्ट फेल्युअर सारख्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. चिंताजनक बाब म्हणजे उच्च रक्तदाब असलेल्या अनेक तरुणांना नुकसान होईपर्यंत हे कळत नाही. हार्ट फेल्युअर टाळण्यासाठी तरुणांनी त्यांच्या रक्तदाबाचे नियमितपणे निरीक्षण केले पाहिजे.
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि हृदयाचे संरक्षण करण्यासाठी खास टिप्स
नियमित तपासणी करा : रक्तदाब हा १२०/८० मिमीएचजी पेक्षा कमी असावा. जर एखाद्याला उच्च रक्तदाब असल्याचे आढळले तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, जेणेकरुन वेळीच उपचार सुरु करता येतील.
मीठाचे सेवन मर्यादित करा : आहारातील सोडियमचा जास्त प्रमाणामुळे रक्तदाब वाढतो. म्हणून, मिठाचे सेवन मर्यादित करा. प्रक्रिया केलेले पदार्थ, मिठाचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ आणि हवाबंद डब्यातील पदार्थांचे सेवन टाळा.
व्यायाम करा : आठवड्यातून किमान ५ दिवस ४५ मिनिटे व्यायाम करा. नियमित शारीरिक हालचाल करा जेणेकरुन रक्तदाब व्यवस्थापित करण्यास आणि हृदयरोग टाळण्यास मदत होईल.
वजन नियंत्रित राखा : लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराची शक्यता वाढते. म्हणून वजन नियंत्रित राखणे गरजेचे आहे.
संतुलित आहार घ्या : ताजी फळे, भाज्या आणि तृण धान्यांचे सेवन करा. धूम्रपान, मद्यपान आणि मादक पदार्थांचे व्यसन टाळा आणि पुरेसे पाणी प्या.
स्ट्रेस मॅनेज करा : ताण एखाद्याचा रक्तदाब वाढवू शकतो, म्हणून योग आणि ध्यान करून तणावाची पातळी कमी करता येऊ शकते. जीवनशैलीतील योग्य बदल करुन तुमच्या हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवा.