टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इतिहास रचला आहे. जसप्रीत बुमराह आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये नंबर 1 गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराह यासह वनडे, टी 20 नंतर कसोटीत पहिला क्रमांक पटकवणारा पहिला गोलंदाज बनला आहे. आयसीसीने नेहमीप्रमाणे बुधवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये बुमराहने ही कामगिरी केली आहे. बुमराहने इंग्लंड विरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. बुमराहला त्याचा फायदा रँकिंगमध्ये झालाय.
बुमराहने इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात एकूण 6 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात 3 अशा एकूण 9 विकेट्स मिळवल्या. बुमराहला त्यासाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. बुमराहने अवघ्या 34 कसोटी सामन्यांनंतर नंबर 1 होण्याचा बहुमान मिळवला. बुमराह व्यतिरिक्त पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये टीम इंडियाच्या दोघांचा समावेश आहे. यामध्ये आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोघे आहेत.
जसप्रीत बुमराह याने आर अश्विन याला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. बुमराहला 2 स्थानांचं नुकसान झाल्याने तो थेट तिसऱ्या स्थानी फेकला गेला आहे. बुमराहचे 881 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा स्टार बॉलर कगिसो रबाडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रबाडाच्या नावावर 851 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर रवीचंद्रन अश्विन याच्या नावे 841 रेटिंग्स आहेत. तर रवींद्र जडेजा याची 746 पॉइंट्ससह नवव्या स्थानी घसरण झाली आहे.
दरम्यान जसप्रीत बुमराहला याला इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. इंग्लंड पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात केली. त्यानंतर टीम इंडियाने दुसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली. आता तिसरा सामना हा 15 फेब्रुवारीपासून होणार आहे.
जसप्रीत बुमराह सातत्याने क्रिकेट खेळतोय. तसेच पुढील काही सामन्यांसाठी तो उपलब्ध असावा, यासाठी खबरदारी म्हणून त्याला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता त्याला विश्रांती देण्यात येते की नाही, हे टीम इंडियाची घोषणा केल्यानंतरच स्पष्ट होईल.