महाराष्ट्रात 61 दिवस मासेमारी बंद, महाराष्ट्र सरकारच्या सूचना

मे महिन्यातच पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीलादेखील पावसाने झोडपून काढले आहे. मात्र सध्या कोसळणारा हा पाऊस अवकाळी आहे. मान्सून 25 ते 27 जूनपर्यंत केरळमध्ये धडकणार आहे. तर, त्यानंतर तळकोकणात हजेरी लावणार असून 1 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. पावसाळा हा काळ माशांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळं 1 जून ते 31 जुलैदरम्यान मासेमारी बंद असणार आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो त्यामुळं 1 जून ते 31 जुलैदरम्यान यंत्रचलित व यांत्रिक नौकांना समुद्रात मासेमारी करण्यास मत्स्य विभागाने बंदी घातली आहे.

पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर – यंत्रचलित नौकांना ही बंदी लागू नाही. मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका 1 जूनपूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. 31 जुलै किंवा त्यापूर्वी नौकांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत.

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना आदेश लागू राहतील. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येणार आहे.

पावसाळ्याच्या हंगामात माशांचे प्रजनन होत असते. अशावेळी मासेमारी केल्यास प्रजनन झालेले मासे जाळ्यात येऊन मासेमारी कमी होऊ शकते. त्यामुळे पावसाळी काळात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात येते. पावसाळ्याच्या काळात मासेमारी बंद असल्यामुळं मासळी बाजारात होणारा पुरवठा हा कलकत्ता किंवा गुजरात या भागातील असणार आहे. तसंच, खवय्यांना काहीकाळ सुक्या मच्छिवर अलवंबून राहावे लागणार आहे.