विटा येथील कार्वे येथील एमआयडीसी मध्ये गोकुळाबाई पाटील यांच्या मालकीच्या राम कृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी २७ जानेवारी रोजी सुमारे ३० कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केल्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या एमडी ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच विट्यातील बलराज कातारी आणि गोकुळाबाई पाटील यांच्यासह रहुदीप बोरीचा, सुलेमान शेख, जितेंद्र परमार, अब्दुल रझाक शेख, सरदार पाटील या सात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विट्यातील एमडी ड्रग्ज फॅक्टरीतून तयार होणाऱ्या मालाची खरेदी विक्री करणाऱ्या दोन मुख्य आरोपींच्या मुंबईतून मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी मोहम्मद कयूम अकबर अली शेख (वय ३६ रा. कुर्ला) आणि मोहम्मद इस्माईल सलीम खान (वय ४५ रा. सांताक्रुज ) या दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे.
