भारतीय अर्थव्यवस्थेचे सर्जिकल स्ट्राइक; आता जर्मनीलाही पछाडणार

नीती आयोगाचे CEO बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी एक मोठी घोषणा केली. शनिवारी सुब्रमण्यम यांनी पत्रकार परिषदेत भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असल्याची घोषणा केली. यासह भारताने जपानला मागे टाकले आहे. नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या 10 व्या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली असून सुब्रह्मण्यम म्हणाले की, जागतिक आणि आर्थिक वातावरण भारतासाठी अनुकूल आहे.

त्याचप्रमाणे, योग्य नियोजन आणि विचारसरणीने भारत पुढील अडीच ते तीन वर्षांत जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल, असा विश्वासही सुब्रमण्यम यांनी वर्तवला.

भारत बनली चौथी मोठी इकॉनॉमी

भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 4000 अब्ज डॉलर्सचा असल्याचं सुब्रमण्यम यांनी IMF कडून मिळालेल्या आकडेवारीचा हवाला देऊन सांगितले. सुब्रमण्यम म्हणाले की आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी भारताच्या पुढे आहेत. सुब्रमण्यम म्हणाले, “मी बोलतोय तसे, आपण चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत. आज आपण 4000 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहोत.”

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल

याआधी भारत 2024 पर्यंत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा अंदाज होता पण, आपण एक पाऊल पुढे टाकले आणि प्रगती पथावर अचूक वाटचाल करत राहिल्यास भारत लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, “आपण आपल्या योजना आणि विचारांवर ठाम राहिलो तर अडीच ते तीन वर्षांत आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू.”

यावर IMF नेही आपले मत मांडले. एप्रिलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालात, IMF ने म्हटले होते की भारत 2025 मध्ये जपानला मागे टाकेल आणि भारताचा GDP $4,190 अब्जपर्यंत पोहोचेल. त्याचवेळी, IMF च्या आकडेवारीनुसार भारतातील लोकांचे उत्पन्न देखील वाढल्याचे दिसून आले आहे. 2013-14 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न 1,438 अमेरिकन डॉलर्स होते, जे 2025 मध्ये दुप्पट होऊन $2,880 होईल. यावरून लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचं दिसत आहे.

नीती आयोगाचा अंदाज काय

नीती आयोगाच्या ‘विकसित भारतासाठी विकसित राज्ये @ 2047’ या अप्रोच पेपरमध्ये असे म्हटले आहे की भारताला ‘फ्रेजाइल फाइव्ह’ अर्थव्यवस्थांपैकी एक मानले जायचे पण, आता जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांपैकी आहे. भारताकडे क्षमता आहे आणि 2047 पर्यंत उच्च उत्पन्न असलेला देश बनण्याचे उद्दिष्ट आहे.

अप्रोच पेपरमध्ये म्हटले आहे की विकसित भारत 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असेल, ज्यात विकसित देशाची सर्व वैशिष्ट्ये असतील आणि दरडोई उत्पन्न आजच्या उच्च उत्पन्न असलेल्या देशांच्या तुलनेत असेल.