सुनिल शेट्टी एकेकाळी वडिलांच्या हॉटेलमध्ये काम करायचा आणि आज तो 125 कोटींचा मालक आहे. त्याने एवढी संपत्ती कशी कमवली? नेमकं त्याने काय केलं? हे स्वत: सांगितलं. तो काय म्हणाला पाहुूयात… ‘मोहरा’, ‘बॉर्डर’, ‘धडकन’, ‘मैं हूं ना’, ‘हेराफेरी’ यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता म्हणून सुनील शेट्टीला ओळखलं जातं. क्रिकेटपटू के. एल. राहुलचा सासरा अशीही सुनील शेट्टीची ओळख सांगता येईल. मात्र एक उत्तम अभिनेता असण्याबरोबरच सुनील शेट्टी त्यांची फिटनेस आणि यशस्वी उद्योजक म्हणूनही ओळखला जातो.
तुमचा विश्वास बसणार नाही पण सुनील शेट्टीची एकूण संपत्ती 125 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. मात्र सुनील शेट्टीने एवढी संपत्ती कमवण्यामागील मूळ मंत्र नुकताच एका मुलाखतीत सांगितला. ‘ईटी रिटेल’नुसार सुनील शेट्टीने अन्न वितरण म्हणजेच फूड डिस्ट्रीब्युशन चैनपासून टेक इकोसिस्टमपर्यंत अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे, अनेक कंपन्यांमध्ये तो भागीदार आहे. सुनील हा सर्वात यशस्वी व्यावसायिकांपैकी एक असला तरी, अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने गुंतवणुकदारांना एक कानमंत्र दिला आहे. गुंतवणूक कशापद्धतीने वाढत आहे याची खात्री कशी करावी याबद्दल सुनील शेट्टीने या मुलाखतीत एक उद्योजक म्हणून खुलासा केला.
‘जीक्यू इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीची ओळख मुलाखतकाराने, ‘सर्वच व्यवसायांमध्ये हुशार असलेली व्यक्ती’ अशी करुन देताच सुनील शेट्टी खुदकन हसला. आपली अशी अनोख्या पद्धतीने ओळख करुन दिल्यानंतर हसतच सुनील शेट्टीने, “आजच्या युगात वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पैसा गुंतणे अधिक फायद्याचे ठरते. एक अभिनेता म्हणून, पूर्वी फक्त रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करता येत होती. रिअल इस्टेट वगळता तुम्ही इतर कशातही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही त्याची काळजी घेतली नाही तर त्यामधून हवा तसा परतावा मिळणार नाही आणि ती गुंतवणूक काम करणार नाही,” असं मत नोंदवलं.
“जर तुम्ही तुमच्या या बाळाची काळजी घेतली नाही, तर ते तुम्हाला हवा तसा प्रतिसाद देणार नाही. या नवीन पिढीच्या माध्यमातून आणि एकूणच स्टार्टअप विश्वातून तुम्हाला मोठमोठ्या संस्थापकांसोबत काम करण्याची संधी मिळते. अशा वेळी मी गुंतवणूक केल्यावर मला एक खात्री असते की मी गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून फार सुरक्षित आहे,” असं सुनील शेट्टी म्हणाला. स्टार्टअपमधील गुंतवणुकीकडे तू कसा पाहतो असा प्रश्न सुनील शेट्टीला विचारण्यात आला. यावर त्याने, “मी सहसा फक्त एकाच पैलूवर लक्ष केंद्रित करतो. मग ते मार्केटिंग असो, किंवा ब्रँडला व्हिजीबिलीटी मिळणं असो, आवश्यक असलेली मीडियाच्या माध्यमातून मिळणारी मदत (प्रसिद्धी) मिळाली पाहिजे असा प्रयत्न करतो,” असं उत्तर दिलं. “मात्र याशिवाय मला काहीही माहित नसल्याने मी त्यात फारसा हस्तक्षेप करू इच्छित नाही. मी फक्त युनिकॉर्न कंपन्या शोधत नाही. माझ्यासाठी कोणीही समोर ठेवलेल्या कल्पनांपेक्षा, ती सादर करण्याऱ्या लोकांपेक्षा आणि त्यांच्याकडे ‘काय?’ आहे यापेक्षा जे काही करतोय ते ‘का?’ करतोय हे विचारणं अधिक महत्त्वाचं आहे. मी कधीच मूल्यांकनाकडे पाहत नाही. मी त्या व्यक्तीशी असलेले नाते आणि त्यांच्या दृष्टिकोनाला महत्त्व देण्याचा प्रयत्न करतो,” असं सुनील शेट्टी गुंतवणूक करण्याचा निर्णय कसा घेतो याबद्दल माहिती देताना म्हणाला.
