राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात हाही आपलाच आणि तोही आपलाच या पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या वाटचालीमुळे त्यांची राजकीय भूमिकाच गुलदस्त्यात राहिली आहे.
खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्याशी त्यांच्या नव्या गट्टीने भविष्यातील राजकारण अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.पोलिस दलाच्या नव्या वाहनांच्या लोकार्पण कार्यक्रमात महाडिक यांच्या मागे बसून मुश्रीफ यांनी बुलेट सवारी केली.
त्यानंतर मी मुन्नांच्या (महाडिक) पाठीशी ठामपणे असल्याचे सांगून त्यांनी एकच खळबळ उडवली आहे; पण त्याचवेळी जिल्ह्याचे प्रमुख सत्ता केंद्र असलेल्या गोकुळसह जिल्हा बँक, बाजार समिती, शेतकरी संघ व अलीकडेच झालेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्याशिवाय पर्याय नाही.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीतही हीच स्थिती आहे. त्याचवेळी श्री. महाडिक यांच्या पाठीशी राहून ते आमदार सतेज पाटील यांना दुखवतील का, हा खरा प्रश्न आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ‘गोकुळ’वरील सत्ता खालसा करण्यात मुश्रीफ यांनी सिंहाचा वाटा उचलला.
आता खासदार महाडिक यांच्या पाठीशी राहून ते ‘गोकुळ’मध्ये परिवर्तन करू शकतील का? उद्या कोल्हापूर दक्षिणच्या निवडणुकीत त्यांना महाडिक कुटुंबातील उमेदवारांसाठी सभा घ्या म्हटले तर ते घेतील का? असे एक ना अनेक प्रश्न मुश्रीफ यांच्या नव्या गट्टीने निर्माण झाले आहेत.यापूर्वीचा मुश्रीफ यांचा राजकीय प्रवासही अनिश्चित असाच राहिला आहे. ‘शरद पवार एके शरद पवार’ म्हणणाऱ्या मुश्रीफ यांनी ऐनवेळी त्यांची साथ सोडली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले.
यापूर्वी सदाशिवराव मंडलिक असतील किंवा विक्रमसिंह घाटगे यांच्याविषयीची त्यांचा अनुभव असाच राहिला आहे. त्यामुळे भविष्यात भाजपकडून जे सांगण्यात येईल, त्याच भूमिकेशी त्यांना बांधील राहावे लागेल.