मंगळवेढा तालुक्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत ८४ हजार ६१० लोकांपैकी ३४ हजार ४६८ लोकांनी आजअखेर आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून घेतल्याची माहिती तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.भाऊसो जानकर यांनी दिली.
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैदयकीय अधिकारी डॉ. भाऊसो जानकर ही योजना पार पाडत आहेत.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची तर महात्मा फुले जन आरोग्य योजना ही शासनाची असून या दोन्ही एकत्रीतरित्या आयुष्यमान भारत योजने अंतर्गत आहेत. दरम्यान केसरी व पिवळे कार्डधारक याचा लाभ घेवू शकतात. यासाठी आधार कार्ड मोबाईलला लिंक असणे महत्वाचे आहे.कुटूंबातील एखादा सदस्य मोठ्या आजारला बळी पडल्यास पाच लाखा पर्यंतचा विमा त्यांना मिळणार आहे.
या योजनेमुळे गोरगरीब लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दामाजी हॉस्पिटल, शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, गजानन लोकसेवा आदी खाजगी दवाखाने यांचा या योजनेत समविष्ट आहे.या योजनेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होवून लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
ई.के.वाय.सी. प्रत्येक व्यक्तीने करुन घेणे महत्वाचे असून यासाठी ग्रामपंचायत, आपले सरकार केंद्र, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी,ग्रामीण रुग्णालय, शहरातील आपला दवाखाना, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी ही नोंदणी सुरु आहे. सध्या आयुष्यमान भारत योजनेची २५ हजार ४०० कार्ड वाटप करण्यात आले असल्याचे डॉ.जानकर यांनी सांगितले.