3 भलेमोठे बॉम्ब, रेल्वे-रस्ते बंद, संपूर्ण शहर सील अन्…

दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक युरोपीयन देशात आजही त्यावेळी फेकण्यात आलेले मात्र पूर्णपणे निष्क्रीय न झालेले बॉम्ब (Bomb)सापडतात. अशाच तीन मोठ्या न फुटलेले बॉम्ब जर्मनीमधील जहाजांच्या कारखान्याजवळ सापडले आहेत. जर्मनीतील कोलोन शहरातील शिपयार्ड परिसरामध्ये साधारण 1945 सालातील म्हणजेच 70 वर्षांपूर्वी फेकण्यात आलेले हे भलेमोठे सक्रीय बॉम्ब सापडल्यानंतर मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धानंतरच्या स्थलांतरांपैकी एक सध्या जर्मनीमध्ये सुरु आहे. या देशात या 3 जुन्याबॉम्ब मुळे तब्बल 20 हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले जात आहे.

अमेरिकी बनावटीचे हे बॉम्ब सापडल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. यानंतर देशातील आपत्कालीन व्यवस्थापनामधील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी शहराच्या मध्यभागी 1 हजार मीटर (3280 फूट) परिघ असलेला परिसर पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच या एवढ्या परिघामध्ये एकही व्यक्ती पुढील सूचना मिळेपर्यंत राहणार नाही आणि सर्वांना स्थलांतरित व्हावं लागणार असं जाहीर करण्यात आलं. ओल्ड टाउन आणि ड्यूट्झ या दोन्ही परिसरातील नागरिकांना यामुळे स्थलांतरित व्हावं लागलं. जर्मनीमधील ही ‘दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरची सर्वात मोठी कारवाई’ आहे, असं सांगण्यात आलं आहे. या कारवाईअंतर्गत व्यवसाय, हॉटेल्स, शाळा आणि अगदी रुग्णालये देखील रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शासनाने दिलेले आदेश माननण्यास नकार दिल्यास जबरदस्तीने तेथून नागरिकांना हाकलून लावण्याचे अधिकार देण्यात आले असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच अशा आपत्कालीन प्रसंगी विरोध करणाऱ्यांना सरकार मोठा आर्थिक दंडही करु शकते. “जर नागरिकांनी स्तलांतर करायला नकार दिला तर त्यांना त्यांच्या घरातून अगदी गरज पडल्यास पोलीस बळाचा वापर करुन बाहेर काढू,” असे ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

या स्थलांतरणामुळे सदर परिसरातील 58 लहान-मोठी हॉटेल्स, नऊ शाळा, प्रमुख सरकारी इमारती आणि फिलहारमोनिक हॉलबरोबरच अनेक संग्रहालयांसहीत सांस्कृतिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. रस्ते वाहतूक बंद करण्यात आली असून या भागातून जणाऱ्या रेल्वे रद्द केल्याने परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे.

पुढील काही दिवस या भागातील लोकांना स्थलांतरित करण्याचं काम सुरु असणार आहे. बॉम्ब निकामी करणारं पथक बुधवारी स्फोटके निकामी करेल अशी अपेक्षा आहे. मात्र हा संपूर्ण परिसर रिकामा केल्यानंतरच हे नाजूक काम सुरू होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी रहिवाशांना इशारा देताना म्हटलं आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी रुग्णवाहिकांबरोबरच इतर सुविधाही पूर्ण सज्जतेनं तैनात करण्यात आल्या आहेत.

जर्मनीमध्ये महायुद्धाच्या काळातील सक्रीय बॉम्ब सापडणे दुर्मिळ गोष्ट नाही. या देशात अनेकदा बांधकामासाठी पाया खोदताना जर्मनीविरोधात लढलेल्या मित्र राष्ट्रांच्या हवाई हल्ल्यांचे अवशेष अजूनही सहज आढळून येतात. मात्र यावेळी सापडलेल्या बॉम्बचा आकार आणि तो ज्या भागात सापडला आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांवर परिणाम होणार असल्याने चिंतेत भर पडली आहे.