अयोध्या राम मंदिरात किती आणि कुठे कुठे सोनं वापरण्यात आलं ?

उत्तर प्रदेशधील अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीमध्ये किती सोनं वापरलं आहे याची माहिती समोर आली असून या सोन्याची एकूण किंमत किती आहे हे ही स्पष्ट झालं आहे. श्रीराम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच या सोन्याचा मंदिराच्या बांधकामामध्ये नेमका कुठे कुठे वापर करण्यात आला आहे हे सुद्धा मिश्रा यांनी सविस्तरपणे सांगितलं आहे.

गुरुवारी श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर भगवान राम, देवी सीता व भाऊ लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न व रामभक्त हनुमान यांच्यासह राम दरबाराची संपूर्ण विधिनोक्त रीतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच मंदिरात किती सोनं वापरण्यात आलं आहे याची माहिती जाहीर करण्यात आली. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत एकूण 45 किलो सोनं वापरण्यात आल्याचं मिश्रा यांनी शुक्रवारी सांगितलं.

मंदिरात वापरण्यात आलेलं सर्व 24 कॅरेट शुद्ध सोनं असल्याचं सांगताना त्याची एकूण किंमत 50 कोटी रुपयांपर्यंत असल्याचंही मिश्रा यांनी आवर्जून नमूद केलं. हे सोनं नेमकं कुठे वापरण्यात आलं आहे याबद्दल माहिती देताना मिश्रा यांनी हे सोनं मंदिराची दारे व भगवान श्रीरामांच्या सिंहासनामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आल्याचं सांगितलं. तसेच याबरोबरच शेषावतार मंदिरातील सोन्याचे काम अद्यापही सुरू आहे, असंही ते म्हणाले.

गुजरातच्या मुकेश पटेल या हिरे व्यावसायिकाने श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासला 11 मुकुट व सोन्याच्या धनुष्यबाणासह अनेक बहुमूल्य दागिने दान दिले आहेत. 1 हजार कॅरेट हिरे, 3 किलो चांदी, 300 ग्रॅम सोने व 300 कॅरेट माणिकपासून हे 11 मुकुट तयार केले आहेत.

शिखरावर ध्वज फडकावणे हे मंदिर उभारणीतील अंतिम काम आहे. हे काम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमधील हवामान अनुकूलतेवर अवलंबून असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मिश्रा यांनी असेही सांगितले की, श्रीराम मंदिराच्या मुख्य संरचनेचे निर्माण काम पूर्ण झालेले आहे. परंतु संग्रहालय, सभागृह व अतिथी गृहासह मंदिर परिसरातील अन्य भाग अद्याप निर्माणाधीन असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ही सर्व कामे डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गुरुवारी प्राणप्रतिष्ठेनंतर भाविकांना पहिल्या मजल्यावर प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.