सध्या काही राजकीय नेते किंवा राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या घरातून आलेले कलाकार इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहेत. सयाजी शिंदे, सुशांत शेलार यांसारखे कलाकार राजकारणातही सक्रीय आहेत. अशातच आता एक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातूसुद्धा अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार असून त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.

बाळासाहेब (Balasaheb) ठाकरे यांचा नातू म्हणजे जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे अनुराग कश्यपच्या ‘निशांची’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाच्या टीझरचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आलाय. अनुराग कश्यप दिग्दर्शित या रॉ आणि ग्रिटी क्राईम ड्रामा सिनेमामध्ये ऐश्वर्य ठाकरेचा दमदार अभिनय दिसणार आहे. ऐश्वर्य ठाकरेसोबत या सिनेमात वेदिका पिंटो, मोनिका पवार, मोहम्मद झीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांसारखे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
‘निशांची’ या सिनेमात दोन भावांचं गुंतागुंतीचं आयुष्य मांडण्यात आलं आहे. या सिनेमाची झलक प्रदर्शित होताच प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली असून नेटकरी या सिनेमाच्या टीझरवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ‘निशांची’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं असून, जार पिक्चर्स आणि फ्लिप फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने अजय राय आणि रंजन सिंह यांनी निर्मिती केली आहे.
‘हे ड्रॉप होताच जाणवलं की काहीतरी भन्नाट येणार आहे. ही हायप नाही, हे खरे सिनेमा वायब्स आहेत!’, ‘या चित्रपटानंतर गल्ली गल्लीची हवा बदलेल, खरंच!’ ‘हे इतकं सहजसोपं का वाटतंय? मी तर आधीपासून फॅन झालोय.’, ‘श्वर्य ठाकरेने काही न बोलता जाहीर केलं – ‘मीच हिरो आहे!’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या सिनेमाच्या भन्नाट टीझरवर केल्या आहेत.
