‘आखाड तळण’ म्हणजे काय? पूर्वापार चालत आलीये ही अनोखी प्रथा

दोन दिवसांनी आषाढ महिन्याला सुरुवात होईल. आषाढ सुरू झाला की समस्त महाराष्ट्रातील जनतेला वेध लागतात ते आषाढी वारीचे. आषाढी महिन्यात वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला जातात. आषाढापासून चातुर्मासाची सुरूवात होते. आषाढ एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ चातुर्मासाचा काळ मानला जातो. त्याचबरोबर आषाढ महिन्याचे एक वैशिष्ट्ये म्हणजे आषाढ तळणी किंवा आखाड तळणी. आजही अनेक गावांकडे बायका एकमेकींना विचारतात आखाड तळण उरकून घ्या, असं म्हणतात. आखाड तळण (Akhad Talan) म्हणजे का आणि ते का करतात, हे जाणून घ्या.

आषाढ महिना सुरू झाला की जास्तीत जास्त तळलेले पदार्थ केले व खाल्ले जातात. मे महिन्यात बनवलेले पापड, कुरडया तळून खाल्ल्या जातात. तर काही जणी तिखट-मिठाच्या पुऱ्या तळतात. म्हणजेच या महिन्यात काहीना काही तेलकट पदार्थ केले जातात. काही ठिकाणी तर मुलीला माहेरी बोलवून तिचा पाहुणचार करतात. तिच्यासाठी खास तळलेले पदार्थ केले जातात व तिच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. पण असे पदार्थ का केले जातात, हे जाणून घेऊयात.

आषाढ महिन्यात धो-धो पाऊस कोसळत असतो. अनेकदा पावसाची संततधार सुरूच असते. त्यामुळं वातावरणात दमटपणा व गारवा असतो. तसंच, आषाढात पाणी प्रदूषित होते. हे दुषित पाणी शरिरात गेले तर आरोग्य बिघडते. अशावेळी शरीराला वंगण मिळावे म्हणून तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते. तसंच, हवेतील गारवा असल्यामुळं तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता पुरवण्याचे काम करतात. त्यामुळं या काळात पदार्थ तळले जातात.

पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते. उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड, लोणची अशी बनवलेली असतात. त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ केले जातात. आषाढ महिन्यात चयापचय क्रिया ही देखील चांगली असते. आपण खाल्ल्ले पदार्थ चांगले पचतात. त्यामुळेही असे पदार्थ खाल्ले जातात. मे महिन्यात केलेले वाळवणाचे पदार्थ पापड, कुरड्या, सांडगे, शेवया या आषाढापासूनच खाण्यास सुरुवात करतात. श्रावणात अनेक व्रत वैकल्यांमुळं खाण्यावर निर्बंध येतात त्यामुळं आषाढात याची कसर भरुन काढण्यात येते.