वडील गवंडी. मुलीची कुस्तीची आवड जपण्यासाठी त्यांनी हातउसने पैसे घेतले. मुलीच्या बक्षिसातून ते फेडता येईल, याची खात्री होती. वडिलांचा विश्वास मुलीने सार्थ ठरवला. ऋतुजा गुरवने १७ वर्षांखालील गटाच्या आशियाई कुस्तीच्या स्पर्धेत मुलींमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.
ऋतुजाचे वडील संतोष हे कोल्हापूरचे (Kolhapur) ते गवंडीकाम करतात. त्यांच्या मुलीला लहानपणापासून स्पर्धा करण्याची सवय. ती मुलांसोबतही कुस्ती खेळत होती. आपल्या मुलीची आवड संतोष यांनी जोपासली. ‘ऋतुजाच्या प्रगतीसाठी आम्ही तिला साथ द्यायचे ठरवले. तिच्या सरावासाठी काहींकडून मदत घेतली, तर काहींनी हातउसने पैसे दिले. राज्य संघटनेनेही मदत केली. मात्र, तरीही पैसे कमी पडत होते. गेल्या वर्षी १५ वर्षांखालील गटाच्या आशियाई कुस्तीतील स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. त्याचे सुवर्णपदकात रूपांतर ऋतुजा गुरव करण्यासाठी ऋतुजाने खूप कष्ट घेतले. गत वर्षी आशियाई स्पर्धेतील पदकाच्या पूर्वतयारीसाठीही आम्ही हातउसने पैसे घेतले होते. ऋतुजाच्या बक्षिसातून ते फेडू शकलो. आत्ताही स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी काही जणांकडून पैसे घेतले आहेत. ते आता लवकरच फेडणार हा विश्वास आहे,’ असे संतोष यांनी सांगितले.
राष्ट्रीय चाचणी स्पर्धेत सोनेरी यश मिळवून भारतीय संघात स्थान मिळवलेल्या ऋतुजाने आपला उच्च दर्जा अंतिम लढतीत अधोरेखित केले. तिला या स्पर्धेत आठवे मानांकन होते. मात्र, तिने तिसरे मानांकन असलेल्या उझबेकिस्तानच्या माशखुरा अब्दुमुसाएवा हिला ११-० असे पराभूत करीत निर्धारित वेळेपूर्वीच बाजी मारली. त्यापूर्वी ऋतुजाने उपांत्य फेरीत आशियाई महिला कुस्तीत ताकद असलेल्या जपानच्या कोहारू अकुत्सूला ४-२ असे हरवले होते.