दक्षिण आशियातील सर्वाधिक लांबीचा केबल आधारित वळणदार वाकोला पूल बांधून तयार झाला आहे. हा सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता (एससीएलआर) प्रकल्पाचा भाग आहे. या पुलामुळे कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ही वाहतूक विनाथांबा शक्य होणार आहे.
पूर्व उपनगरीय वाहनांना पश्चिम उपनगरात जाण्यासाठी तसेच वांद्रे कुर्ला संकुलातील कोंडी टाळण्यासाठी एससीएलआर बांधण्यात आला आहे. त्याअंतर्गत बीकेसी परिसरात एक व कलिना ते कुर्ला (Kurla) दरम्यान एक, असे दोन उड्डाणपूल आहेत. तरीदेखील कलिना येथून विमानतळाच्या दिशेने जाताना पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होते. ती कोंडी फोडण्यासाठी वाकोला जंक्शन येथे विशेष केबल आधारित पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उभा केला असून ते काम आता पूर्ण झाले आहे.
हा पूल वाकोला जंक्शन येथील सिग्नल तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावरील सध्याच्या उड्डाणपुलाच्या डोक्यावरून आहे. त्यामुळे जमिनीपासून त्याची उंची २५ मीटर इतकी आहे. कुर्ल्याकडून येऊन हा पूल वाकोला सिग्नलच्या डोक्यावरून थेट विमानतळाच्या दिशेने पानबाई इंटरनॅशनल शाळेजवळ उतरेल. त्यामुळेच कुर्ला ते विमानतळ ही वाहतूक विनाथांबा, विनासिग्नल व सोपी होईल.
या पुलाला एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी बुधवारी भेट दिली. ‘या आगळ्या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात असून तो नागरिकांच्या सेवेत लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पावसाळ्यातच हा पूल सुरू करण्यात येईल. हा पूल केवळ वाहतूक कोंडीवरचा उपाय नसून मुंबईसाठी एक नवा लँडमार्कदेखील आहे’, असे ते म्हणाले.