विटा, येथील माजी नगराध्यक्ष वैभव सदाशिवराव पाटील यांनी मुंबईत महाराष्ट्र प्रदेश भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. वैभव पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे खानापूर मतदार संघात राजकीय वारे फिरले असून मतदार संघात आता तुल्यबळ लढती होण्याचे संकेत मिळत आहेत.
खानापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटातील आ. सुहास बाबर यांनी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. तसेच पाटील गटाचा बालेकिल्ला असलेल्या विटा नगरपरिषद हद्दीत आमदार बाबर यांनी सुमारे पाच हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य घेत पाटील गटाला हादरा दिला होता. त्यानंतर गेल्या तीन -चार वर्षात विट्यातील नवीन पाणीपुरवठा योजनेसह केलेली कोट्यवधींची विकास कामे, विट्यातील अशोक गायकवाड बंधूंची मिळालेली साथ, विट्यातील मूळ भाजपचा पाठिंबा या सर्व जमेच्या बाजूमुळे विटा नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांचा गट ऐतिहासिक कामगिरी करणार असल्याची शक्यता राजकीय तज्ञातून व्यक्त होत होती.
माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी विधानसभेची निवडणूक शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती. परंतु आता बदललेली राजकीय समीकरणे विचारात घेऊन वैभव पाटील यांनी थेट भाजपत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. मतदार संघात आमदार पडळकर आणि आमदार बाबर यांच्यात राजकीय वैर आहे. त्यामुळेच वैभव पाटील यांनी आमदार पडळकर यांच्याशी मिळतेजुळते घेण्याची भूमिका घेतली. त्यांच्या या निर्णयाचा निश्चितपणे सकारात्मक उपयोग होईल अशीच सध्या चर्चा सुरू आहे.
वैभव पाटील भाजपत गेल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठे नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आमदार पडळकर आणि पाटील गट एकत्र येण्यामुळे मतदार संघातील राजकीय वाऱ्याची दिशा बदलण्याचे संकेत मिळत आहेत. पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विटा शहरात आतिषबाजी करत त्यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी भाजपत प्रवेश करत स्थानिक विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. विटा शहरातील भाजपचे माजी नगरसेवक अनिल म. बाबर यांचा गट हा पाटील गटाचा पारंपरिक विरोधक आहे. आता वैभव पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे मूळ भाजपच्या या गटाची मोठी कोंडी होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत पारंपरिक मित्र असलेल्या बाबर गटासोबत जायचे की नव्याने भाजपत आलेल्या पाटील गटासोबत, असे धर्मसंकट त्यांच्यापुढे उभे राहणार आहे.
