कोल्हापुरात तणाव.….. या भागात पोलिस छावणीचं स्वरूप

लक्षतीर्थ वसाहतीत अनधिकृतपणे सुरू असलेल्या दोन प्रार्थनास्थळांवरून तणाव निर्माण झाला.धार्मिक वापर करता येणार नसल्याचे सांगत महापालिकेने ती बंद करण्यास भाग पाडले.

कडेकोट पोलिस बंदोबस्तामुळे रंकाळा रोडपासून संपूर्ण लक्षतीर्थ वसाहतीला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. यामुळे तणाव निर्माण झाला होता.लक्षतीर्थ परिसरात रहिवासासाठी परवानगी आहे. गुंठेवारीतून अनेक मिळकती बांधल्या आहेत, तसेच अनेकांनी नियमितीकरणासाठी प्रस्ताव दिले आहेत; पण तेथील जागेचा धार्मिक वापर करण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी आवश्‍यक आहे. ती नसताना लक्षतीर्थमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थनास्थळांकडून धार्मिक कार्य सुरू होते.

अशा अनधिकृतपणे चालणाऱ्या प्रार्थनास्थळांबाबत विश्‍व हिंदू परिषदेने तक्रार दिली होती. त्यानुसार महापालिकेच्या नगररचना विभागाच्यावतीने नोटीस बजावल्या होत्या. त्याचा कालावधी संपल्यामुळे आज कारवाई करण्याचे नियोजन केले होते.

नोटिशीनंतर काल झालेल्या बैठकीत धार्मिक वापर बंद करत असल्याचे लेखी पत्र प्रार्थनास्थळांकडून दिले होते. नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता सुनील भाईक, चेतन आरमाळ हे दोन्ही प्रार्थनास्थळात गेल्यानंतर तेथील वापर बंद असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्यावतीने पंचनामा करण्यात आला व प्रार्थनास्थळांना कुलपे लावण्यात आली.

पक्के बांधकाम केलेल्या प्रार्थनास्थळातील नागरिकांनी धर्मादाय विभागाकडून परवानगी घेतली आहे. तसेच गुंठेवारी नियमितीकरणासाठी प्रस्ताव सादर केला आहे, असे सांगण्यात आले. धार्मिक वापर केला जाणार नाही, असेही सांगितले. त्यानुसार दोन्‍ही ठिकाणांमधील काही साहित्य बाहेर काढून कुलूप लावण्यात आले.रंकाळा रोडवरून लक्षतीर्थ वसाहतीकडे जाणाऱ्या टेंबलाई मंदिरापासून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विविध १५ ठिकाणे निश्‍चित करून तिथे पोलिस तसेच बॅरिकेडस्‌ ठेवण्यात आली होती. स्त्री-पुरुष असे १५० पोलिस हेल्मेटसह तैनात होते. प्रार्थनास्थळांकडे वाहने जाऊ नयेत, यासाठी रस्ते बॅरिकेडस्‌ लावून बंद करण्यात आले होते. यामुळे मोठी कारवाई असल्याचे समजून वातावरणात तणाव निर्माण झाला होता.