उष्माघाताचा चौघांना फटका! कोल्हापुरात चाळीशीचा चटका…

कोल्हापुरात सलग दुसर्‍या दिवशी उन्हाचा जबर तडाखा जाणवला. सूर्य आग ओकू लागल्याने शनिवारी दैनंदिन कमाल तापमानात सरासरी 3.1 अंशाची वाढ होऊन पारा 39.6 अंशांवर स्थिरावला होता.यामुळे हा उष्मा असह्य बनला असून कोल्हापूरकरांची अक्षरशः लाही लाही होत आहे. उन्हाचा आघात आता थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

जिल्ह्यात उष्माघाताचे चार रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले. यामुळे कोल्हापूरकरांनी या उन्हात विशेष काळजी घेण्याची गरज आहे.गेला आठवडाभर कोल्हापूरचे तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तापमानात इतकी वाढ झाली आहे की, दुपारच्या सुमारास रस्त्यांमधून गरम झळा येत आहेत.

यावरून वाढलेल्या तापमानाचा अंदाज येतो. या उन्हामुळे उष्माघाताचा धोका देखील वाढला आहे. उष्माघातामुळे राधानगरी तालुक्यात एक, करवीर तालुक्यात दोन तर शिरोळ तालुक्यात एक व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे लागले. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले.