शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर करत कार्यकर्त्यांना खुशखबर दिली. हिंदीसक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू (Thackeray brothers) एकत्र आणि एकच मोर्चा काढणार असल्याची घोषणा राऊत यांनी केली. त्यामुळे ठाकरेसेना आणि मनसे यांची युती निश्चित मानली जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ठाकरे बंधूंच्या मोर्चाला हजर राहण्याची तयारी मिटकरींनी दर्शवली.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
मराठी भाषेच्या संदर्भात आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसंदर्भात दोन्ही नेते एकत्र येऊन दौरा (मोर्चा) काढत असतील, तर त्याचा एक चांगला परिणाम दिसून येईल, असं मला वाटतं. शेवटी मराठी आपली भाषा आहे, आपली अस्मिता आहे. दोघांनीही पक्षविरहित मोर्चा काढण्यासाठी एकत्र येऊन हा निर्णय घेतला असेल, तर त्या निर्णयाचं मी स्वागत करतो, असं अमोल मिटकरी म्हणाले.
पाच किंवा सहा तारखेला ठाकरे बंधूंचा मोर्चा ठरत आहे. जर त्या दिवशी विधिमंडळाचं कामकाज नसेल, तर मी त्या दिवशी मोर्चामध्ये सहभागी होईन, असं अमोल मिटकरी स्पष्ट केलं.