बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर 16 ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या दहीहंडी (Dahi Handi) कार्यक्रमात सहभागी झाली होती. जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात तिने ‘भारत माता की जय’चा नारा दिला होता. मात्र, यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकांनी दहीहंडीमधील तिच्या या घोषणेवर टीका केली. आता या वादावर स्वतः जान्हवी कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर दहीहंडी कार्यक्रमातील एक छोटी व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. यात दहीहांडी फोडण्यापूर्वीच प्रेक्षकांमधून ‘भारत माता की जय’च्या घोषणा सुरू होत्या. अशातच ह्या घोषणा ऐकून अभिनेत्रीने देखील दहीहंडी फोडताना हाच नारा दिला.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अभिनेत्री हा व्हिडीओ शेअर करत टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. ती म्हणाली की, जर मी त्यांच्या घोषणेनंतर नाही म्हटलं असतं तरी लोकांना प्रॉब्लेम झाला असता आणि बोलले तर व्हिडिओ एडिट करून मीम मटेरियल बनवलं असतं. यानंतर जान्हवी म्हणाली, ‘मी फक्त जन्माष्टमीला नाही, तर रोज ‘भारत माता की जय’ म्हणेन.’
या दहीहंडीच्या कार्यक्रमात जान्हवी कपूरने मराठीतून भाषण दिलं. यावेळी तिथे आलेल्या सर्वांना तिने जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या आगामी चित्रपट ‘परम सुंदरी’ पाहण्याची विनंती केली.
