जमिनीवर (खाली) बसून जेवणाचे फायदे

१) पचन सुधारते :

जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत होणार्‍या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.

२) वजन घटवण्यास मदत होते :

जमिनीवर बसून जेवल्याने (Eating), वजन कमी होण्यासही मदत होते. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे. जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचे प्रमाण योग्यप्रकारे राखू शकते. टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते.

३) लवचिकता वाढवते :

पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.

४) मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते :

जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते.

५) कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढते :

दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जरूर आनंद घ्यावा.दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी जवळीक वाढते.

६) शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते :

शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे.शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.

७) दीर्घायुषी बनवते :

ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते. ‘European Journal of Preventive Cardiology’च्या अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे, असे समजावे. कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षात होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक असते.

८) गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात :

Yoga for Healing या पुस्तकाचे लेखक पी.एस. वेंकटेशवरा यांच्यामते, पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकतादेखील वाढते.

९) चंचलता कमी होते :

मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील त्रास कमी होतात.

१०) हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो :

काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का ? हो हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.