भाजप खासदाराच्या विजयाची जबाबदारी घेतली आमदार शिंदे बंधूंनी

सांगोला (प्रतिनिधी):- माढा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना आगामी लोकसभा निवडणुकीत दोन लाख मतांनी विजयी करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे.(responsibility) त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे आमदार शिंदेंनी २०१९ मध्ये निंबाळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या तिकिटावर माढ्यातून निवडणूक लढवली होती.

त्यामुळे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयाची जबाबदारी आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे यांनी स्वीकारल्याने माढा लोकसभा मतदारसंघात चर्चा सुरू झाली केम ता. करमाळा येथे कन्याकुमारी एक्सप्रेस या रेल्वे गाडीला केम येथे थांबा मिळाल्याबद्दल करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडी रवाना करण्यात आली. (responsibility) या कार्यक्रमास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर अध्यक्षस्थानी होते.

यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार संजयमामा शिंदे यांच्यातील वाढती जवळीक व पुढं निवडणुकीत ही तिकीट वाटप कसं होईल याविषयी उपस्थितांत चर्चा रंगली होती. खासदार निंबाळकर यांना पाठिंबा देताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी कामे केली असून विकास केला आहे. आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात असलो तरी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी विकासाच्या बाबतीत आम्हाला डावलले नाही. आतातर आपण अधिकृतपणे एकत्र आहोत.

पुढच्या वेळेस तुम्ही खासदारकीला उभा रहावे. करमाळा आणि माढा तालुक्यातून संपूर्ण सहकार्य राहील याची ग्वाही दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत, रेल्वेचे शैलेंद्र सिंग, करमाळा भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, कुर्डुवाडी भाजपचे शहराध्यक्ष उमेश पाटील, केम गावचे जेष्ठ नेते दिलीपदादा तळेकर, दादासाहेब पारखे, केम गावचे सरपंच अजित तळेकर, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. खा. निंबाळकर यांनी शिंदे बंधूंसोबत सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. राज्यात नुकताच अजित पवार गट भाजपसोबत गेल्याने ते नाते आणखी घट्ट झाले आहे. कारण दोन्ही शिंदे बंधू अजितदादांच्या गोटात सहभागी झाले आहेत.

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे आणि भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यात चांगलेच राजकीय सूत जुळल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच आमदार बबनराव शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत निंबाळकर यांना विजयी करण्याची जबाबदारी घेऊन दोन लाखांचे मताधिक्क्य देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे दोन्ही आमदार शिंदे बंधू हे खासदार निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात सध्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना दोन लाखांचे मताधिक्क्य देण्याची ग्वाही दिल्याने खा. निंबाळकर यांचे पारडे जड झाल्याची चर्चा सुरू आहे. मागील लोकसभा निवडणुकीनंतर दूर झालेल्या शिंदे आणि निंबाळकर यांच्यात पुन्हा दोस्ताना झाला आहे.