महाऑनलाईन प्रणाली ठप्प ; शैक्षणिक दाखल्यांच्या मंजुरीला खोळंबा

राज्य महाऑनलाईन प्रणालीमध्ये गेले काही दिवस सातत्याने येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे सांगोला तहसील कार्यालयात शैक्षणिक दाखल्यांची मंजुरी प्रक्रिया संथ झाली आहे. याचा फटका विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि पालकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जात , उत्पन्न , रहिवासी यांसारख्या शासकीय दाखल्यांसाठी शासनाने महाऑनलाईन प्रणाली कार्यान्वित केली आहे. मात्र , ही प्रणाली सध्या वारंवार बंद पडत आहे. यामुळे संबंधित दाखले वेळेत तयार होऊ शकत नाहीत. विशेषतः सध्या सुरु असलेल्या शैक्षणिक प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती अधिकच गंभीर बनली आहे. प्रत्येक दिवशी तालुक्यातील शेकडो विद्यार्थी दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात उपस्थित राहत आहेत. टोकन प्रणालीद्वारे दाखल्यांचे नियोजन सुरु असले तरी, ऑनलाईन प्रणाली कोसळल्यामुळे दाखल्यांच्या मंजुरीला विलंब होत आहे. काही विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया थांबण्याची किंवा संधी गमावण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.