पुण्यात IT क्षेत्रातील नोकरदारांना मोठा दिलासा

पुण्याच्या हिंजवडी, खराडी, मगरपट्टा या आणि अशा इतर भागांमध्ये असणाऱ्या आयटी (IT) कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येनं पुणे आणि पुण्याबाहेरी मंडळी नोकरीसाठी रुजू असून, राज्याबाहेर अनेक नोकरदारही पुण्यासह पुण्यानजीकच्या भागात स्थायिक होताना दिसत आहेत. मात्र त्यांच्यापुढं असणाऱ्या अनेक समस्या आणि कंपन्यांपुढं असणाऱ्या काही अडचणी पाहता एकिकडे आयटी पार्कच्या स्थलांतराची चर्चा जोर धरत असतानाच दुसरीकडे पुणे प्रशासनानं त्यावर तोडगा काढण्याच्या हेतूनं पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे.

पुणे प्रशासनाच्या वतीनं पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीनं प्रामुख्यानं हिंजवडी, खराडी आणि आयटी पार्कच्या दिशेनं असणाऱ्या भागासाठी डबलडेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, पुण्यातील वाहतूक व्यवस्थेमध्ये केल्या जाणाऱ्या या प्रयोगाचा शुभारंभ या आयटी हबपासूनच केला जाणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडचा भाग पाहता तिथं हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, हडपसर यांसारख्या भागांमध्ये आयटी क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या बड्या संस्थांची कार्यालयं असून, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधांच्या अभावी या संस्थांना कैक अडचणींचा सामना करावा लागत होता. ज्यामुळं कंपन्यांनी येथून गाशा गुंडाळण्याची तयारी दाखवली असता तातडीनं या भागामध्ये पर्यायी उपाययोजनांवर प्रशासनानं काम सुरू केल्याचं पाहायला मिळालं.

पुण्यात, प्रामुख्यानं आयटी क्षेत्रातील कार्यालयांच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुशं कर्मचारी वर्गापुढं उभ्या राहणाऱ्या अडचणी पाहता, इथं डबल डेकर बससेवा सुरू केल्या जाणार आहेत. ज्याअंतर्गत एका खासगी कंपनीच्या पथकाकडून या भागांची पाहणी करत तिथं प्रायोगिक तत्त्वावर पुणे महानगर परिवहनच्या वतीनं डबल डेकर बस चालवण्यात येणार आहे. तेव्हा आता प्रशासनानं शोधलेल्या या पर्यायाचा आयटी कंपन्या, तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि मागोमाग पुणेकरांनाही नेमका कसा आणि किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ही सेवा प्रामुख्याने आयटी हब्स असलेल्या हिंजवडी, खराडी, मगरपट्टा आणि हडपसर या भागांमध्ये चालवली जाणार आहे, जिथे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर लवकरच सुरू होणार आहे. यासाठी एका खासगी कंपनीच्या पथकाकडून येत्या आठवड्यात पाहणी केली जाईल आणि त्यानंतर बससेवेचा शुभारंभ होईल.