दादरच्या कबुतरखान्यावर रात्रीतून पुन्हा ताडपत्री टाकली चारही बाजूने पोलीस तैनात

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दादरच्या कबुतरखान्यावरुन (pigeon house) आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे. दादरमधील कबुतर खान्यावर पुन्हा ताडपत्री टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेकडून बांबू आणि ताडपत्री लावण्याचं काम सुरू झालं असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हायकोर्टाच्या निर्देशानंतर या कबुतरखान्यावर या आधीही बांबू आणि ताडपत्री टाकण्यात आली होती. पण जैन समूदायाच्या लोकांनी आंदोलन करुन ती ताडपत्री काढली होती. आता पुन्हा एकदा या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात येत आहे. या ठिकाणी चारही बाजूने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

एकीकडे जैन मुनींनी सरकारला सामूहिक आंदोलन करण्याचा इशारा दिला, तर दुसरीकडे दादरच्या कबुतरखाना परिसरातील बंदोबस्तात रविवारी रात्री अचानक वाढ करण्यात आली. कबुतरखाना परिसरात स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे दादर स्थानकाजवळील कबुतरखान्याला छावणीचं स्वरूप आलं आहे.

जैन समाजाकडून बुधवारी कबुतरखान्याजवळ मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. पालिकेने लावलेल्या ताडपत्री आंदोलकांनी फाडल्या होत्या. आता पुन्हा एकदा आंदोलनाची शक्यता लक्षात घेता मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दादरमधील कबुतरखाना बंद करण्यास जैन समाजाचा तीव्र विरोध आहे. अशातच जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी थेट सरकारलाच आव्हान देण्याची भाषा सुरू केली. कबुतरखान्याला विरोध करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना देखील जैन मुनींनी काही प्रश्न विचारलेत. तसंच कबुतर खान्यासंदर्भात सरकारनं अपेक्षित भूमिका घेतली नाही तर कबुतरखान्यातच सामूहिक आंदोलन करण्यात येईल असा इशारा जैन मुनींनी दिला.