पाच महिलांसह ५१७ जणांकडे स्वसुरक्षेसाठी शस्त्र

आपल्या जिवाला कोणाकडून धोका होऊ नये आणि स्वसंरक्षणासाठी सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांतर्गत चार ते पाच महिलांसह ५१७ जणांकडे शस्त्रपरवाना आहे. शहराची लोकसंख्या १२ लाखांवर गेली आहे.

त्यासोबतच गुन्हेगारी घटनाही वाढल्या आहेत. शहरात खून, खुनाचे प्रयत्न केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अनेकजण स्वसुरक्षेसाठी शस्त्र बाळगत आहेत. जिवाला धोका असल्यास नागरिक शस्त्र बाळगण्याचा परवाना मागू शकतात. त्याची पोलिसांमार्फत खात्री करून प्रशासनाकडून परवाना दिला जातो.

तसेच सराव करण्यासाठी खेळाडूंनाही शस्त्र परवाना दिला जातो. मात्र, सोलापूर शहरात शस्त्र परवान्याच्या यादीत एकही खेळाडू नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले

बँका, एटीएमच्या सुरक्षेसाठी २० बँकांनी शस्त्र खरेदी केले आहे. १५० सैन्य अधिकाऱ्यांकडे शस्त्रे आहेत. याशिवाय साखर कारखाना, व्यावसायिक यांनीही शस्त्र परवाना घेतला आहे. काही वर्षांत डॉक्टरांवर हल्ले झाल्याने काही डॉक्टरांकडेही शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे. जिवाला धोका असल्याने चार ते पाच महिलाही शस्त्र बाळगत आहेत.

शहरात शस्त्र बाळगणाऱ्या राजकीय नेत्यांची संख्या कमी आहे. तर काही पोलिस अधिकाऱ्यांकडे शस्त्र परवाना आहे. संवेदनशील प्रकरणात केलेली कारवाई, तपास यामुळे त्यांच्या जिवाला धोका असतो. त्यामुळे त्यांना शस्त्र बाळगण्याचा परवाना दिला आहे.

पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांच्या कारकिर्दीत ६५ शस्त्र परवाने रद्द केले आहेत. मुदतीत नूतनीकरण न करणे, परवानाधारकाचे निधन ही त्यामागची कारणे आहेत. तर काहींनी शस्त्र नको असल्याचा अर्ज केल्यानंतर त्यांचा परवाना रद्द केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अजित बोऱ्हाडे यांनी दिली.

पोलिस ठाण्यात अर्ज केल्यानंतर त्याची शहानिशा केली जाते. त्यानंतर पोलिस आयुक्तांकडे शस्त्र परवाना मागणीचा प्रस्ताव पाठविला जातो. चौकशी अहवाल, कागदपत्रांची पूर्तता पाहून पोलिस आयुक्त त्याबाबत निर्णय घेतात. एका शस्त्रासोबत १५० पर्यंत गोळ्या बाळगण्याची परवानगी दिली जाते. परंतु तेवढ्या गोळ्यांची गरज नसल्याने परवानाधारक कमी गोळ्या खरेदी करतात.

सोलापूर शहरात शासनमान्य शस्त्र विक्रीचे एकही दुकान नाही. परवानाधारक पुणे, मुंबईतून शस्त्र खरेदी करतात. दुकानदार परवानाधारक असल्याची खात्री करून शस्त्र विक्री करतात.