परदेशातील विमानतळांप्रमाणे मुंबई विमानतळावरही एक खास सुविधा सुरु झाली आहे. मेट्रो मार्गावर आता थेट मुंबई विमानतळावरुन जाता येणार आहे. ‘कुलाबा वांद्रे- सीप्झ – आरे भुयारी मेट्रो’ मार्गिकेतील टर्मिनल 2 मेट्रो स्थानकावरून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वर पोहचणे अखेर आता सोपे झाले आहे. टर्मिनल 2 मेट्रो स्थानक ते विमानतळ टर्मिनल 2 दरम्यान प्रवास (Journey) थेट आणि सुकर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांधलेला 88 मीटर लांबीचा पादचारी पूल अखेर गुरुवारपासून सेवेत दाखल झाला.
पादचारी पूल सेवेत दाखल झाल्याने भुयारी मेट्रो स्थानकावरून थेट विमानतळावर अवघ्या काही मिनिटांमध्ये पोहचणे शक्य झाले आहे. टर्मिनल 2 मेट्रो स्थानकाद्वारे भुयारी मेट्रो 3 मार्गिका विमानतळाशी जोडण्यात आली आहे. मात्र, त्यात प्रवाशांना होणारी अडचण लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पदाचारी पूल उभारला असून तो सेवेत दाखल झाला आहे. या सेवेमुळे आता ट्रॅफिकमध्ये अडकण्याचं टेन्शन संपलं असून विमानतळावर पोहोचणं अधिक सोयीस्कर होणार आहे.
टर्मिनल 2 मेट्रो स्थानक आणि विमानतळ टर्मिनल 2 यात बरेच अंतर असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. सामान घेऊन अंदाजे 450 मीटर प्रवास करणे अडचणीचे होत होते. या प्रवासासाठी किमान 30 मिनिटे लागत होती. त्यामुळे विमानतळावर जाणारे प्रवासी भुयारी मेट्रोने प्रवास करणे टाळत होते. आता पूल सेवेत दाखल झाल्याने आता काही मिनिटांत टर्मिनल 2 मेट्रो स्थानकावरून पोहचता येऊ लागले आहे.
