जसप्रीत बुमराह आशिया कपमध्ये खेळणार की नाही ?

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आशिया कपमध्ये खेळणार की नाही ? हा प्रश्न अनेक दिवसांपासून विचारला जात होता. आता भारतीय क्रिकेट संघासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह एशिया कपमध्ये खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. बुमराहने थेट निवड समितीला आपण उपलब्ध असल्याचे सांगितले असून, त्यांच्या या निर्णयामुळे संघव्यवस्थापनासोबतच चाहत्यांचाही आनंद डबल झाला आहे.

अलीकडेच इंग्लंडविरुद्ध झालेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील निर्णायक सामन्यात बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली होती. पाच सामन्यांच्या मालिकेत त्यांनी तीनच सामने खेळले आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. यामुळे त्यांच्या फिटनेसबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या.

बुमराहच्या अनोख्या बॉलिंग ॲक्शनमुळे त्याच्या पाठीवर होणाऱ्या ताणामुळे तो अनेकदा दुखापतींना बळी पडला आहे. त्यामुळे एशिया कपसाठी त्याला विश्रांती दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता स्वतः बुमराहनेच बीसीसीआय आणि सिलेक्टरसमोर आपण पूर्णपणे फिट असून खेळण्यासाठी तयार असल्याची माहिती दिली आहे. निवड समिती येत्या आठवड्यात संघ जाहीर करणार असून त्यात बुमराहचं नाव नक्की असणार आहे.

एशिया कप यंदा टी20 स्वरूपात होणार आहे. या फॉर्मेटमध्ये बुमराहसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाचा फायदा संघाला मोठ्या प्रमाणावर मिळेल. त्याला दीर्घ स्पेल टाकावे लागत नाहीत, त्यामुळे दुखापतीची शक्यता कमी राहते. टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यातही त्याने जबरदस्त गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला होता.