भारतीय जेव्हलिन स्टार नीरज चोप्राला झ्युरिख येथे झालेल्या डायमंड लीग 2025 च्या फायनलमध्ये पुन्हा एकदा रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. सुवर्णपदक जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 91.51 मीटरच्या अप्रतिम थ्रोसह पटकावलं. नीरजने 2022 मध्ये डायमंड लीगमध्ये ऐतिहासिक सुवर्ण जिंकले होते. मात्र त्यानंतर सलग तीन वर्षे (2023 युजीन, 2024 ब्रुसेल्स आणि 2025 झ्युरिख) त्याला फक्त रौप्यच मिळालं आहे.
फायनलच्या पहिल्याच प्रयत्नात वेबरने 91.37 मीटरचा थ्रो करून इतर सर्वांवर दबदबा निर्माण केला. नीरजचा पहिला थ्रो 84.34 मीटरवर थांबला. नंतर दुसऱ्या प्रयत्नात वेबरने 91.51 मीटर गाठलं आणि हाच थ्रो निर्णायक ठरला. याचदरम्यान केशोर्न वाल्कॉटने 84.95 मीटर टाकत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली होती.
नीरजचा दुसरा थ्रो 82 मीटरचा होता, पण त्यानंतर सलग तिसरा, चौथा आणि पाचवा थ्रो फाउल ठरला. त्यामुळे तो लयीत येऊ शकला नाही. शेवटच्या सहाव्या प्रयत्नात त्याने 85.01 मीटर गाठलं आणि दुसरे स्थान निश्चित केले. परंतु हे अंतर वेबरच्या 91.51 मीटरच्या थ्रोच्या खूप मागे होते.
टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जेव्हलिन थ्रोमध्ये भारताचं नाव जगभरात पोहोचवलं आहे. 2022 मध्ये तो डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता. मात्र त्यानंतर तो पुन्हा सुवर्ण पदकापर्यंत पोहोचू शकलेला नाही आणि सलग तीन वेळा रौप्यवरच समाधान मानावं लागलं आहे.
