कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार ? याची उत्कंठा कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. एकीकडे भाजपने आपली यंत्रणा तळागाळापर्यंत पोहोचवली असताना महाविकास आघाडीच्या गोटात मात्र अद्यापही शांतता आहे.
अशातच काँग्रेसचे नेते, कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजकीय बॉम्ब फोडून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार कोण असणार ? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अनेक जण इच्छुक आहेत. त्यामध्ये सरप्राईज उमेदवार येऊ शकतो. सरप्राईज चेहरा येऊ शकतो, निवडून येणारा उमेदवार आम्ही देणार आहोत, असे लोकसभेचे महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत संकेत देत पाच इच्छुकांमधील एक चेहरा असू शकतो. जागा कोणालाही सुटली तरी तिन्ही पक्षांत चर्चा होईल, असेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.