खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव यांना दिले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी दिली आहे.
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे करण्यासंदर्भात गेल्या आठवड्यात शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर येथील अधिसभेत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर मंगळवार (दि. २) मुंबईत जाऊन वैभव पाटील यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी हे उपकेंद्र खानापूर येथे झाले. तर दुष्काळी भागाला न्याय मिळेल.
शिवाय खानापूरसह आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, कडेगाव, पलूस, तासगाव आणि माण
तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून खानापूर उपयोगी ठरेल, असे उपमुख्यमंत्री पवार यांना सांगितले. यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी तत्काळ उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवांना संबंधित प्रकरण शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून त्वरित मागणी करून घ्या आणि खानापूर या ठिकाणी विद्यापीठ उपकेंद्र करण्यासंदर्भात कार्यवाही करा, असे आदेश दिल्याची माहिती वैभव पाटील यांनी दिली आहे.