छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) रविवारी रात्री हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील 76 वर्षीय वृद्ध डायबेटीक फूटने आजारी असल्याने रात्री 9 वाजता अपघात विभागात उपचारासाठी दाखल झाला.प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी संबंधित विभागात कळविले. मात्र, सर्जरी विभागाने, आम्ही काय करू? असे म्हणत हात झटकले तर तर मेडिसिन विभाग दखलच घेईना, अशी परिस्थिती या रुग्णावर ओढवली.
अखेर पहाटे 3 वाजता संबंधित रुग्णाला वॉर्डात दाखल करण्यात आले. दरम्यान, सीपीआरमध्ये रात्री येणार्या रुग्णांना वारंवार असे अनुभव येत असल्याचे कळते. प्राथमिक तपासणीत या रुग्णाची शुगर लेवल 500 झाल्याचे निष्पन्न झाले. शुगर नियंत्रित होत नाही तोपर्यंत उपचार करणे जिकिरीचे होते. अपघात विभागातील डॉक्टरांनी तपासणी करून संबंधित विभागांना कळविले. मात्र, संबंधित विभागाचे डॉक्टर वेळेत आलेच नाहीत.
वेदना सहन करत वयोवृद्ध रुग्ण अपघात विभागात तब्बल सहा तास पडून होता. अखेर नातेवाईकांचा रेटा आणि राजकीय फोनाफोनीनंतर रुग्णाला दाखल करून घेतले. वातावरण गंभीर झाल्यानंतर सोमवारी एका वरिष्ठ डॉक्टराने ‘त्या’ वॉर्डात तब्बल तीन तास तळ ठोकून संबंधित रुग्णावर उपचार सुरू केले.
गत सरकारच्या काळात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीपीआरमधील डॉक्टरांची कानउघडणी केली होती; मात्र आता येथील डॉक्टरांना अपघात विभाग असो किंवा वॉर्डातून अर्जंट फोन गेला तरी वेळेत दाखल होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना वेदना सहन करत बसावे लागते. अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, विभागांचे प्रमुख, पथक प्रमुख यांनी हा प्रकार गांभीर्याने घेण्याची गरज आहे; अन्यथा उपचारात हयगय होऊन एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल रुग्णांसह नातेवाईकांमधून होत आहेत.