आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेते मंडळाची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. प्रत्येक पक्षातून सभा, मेळावे यांचे आयोजन केले जात आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत उमेदवारीचा पेच हा दिवसेंदिवस वाढत चाललेला पाहायला मिळत आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी अडचण होऊ नये यासाठी उमेदवारी संदर्भातील संभ्रम दूर करण्याची मागणी पुढे येत आहे.
भास्करराव जाधव डॉ. सुजित मिणचेकर फाउंडेशनच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने आज रविवारी हातकणंगले दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांनी डॉ. मिणचेकर यांच्या उमेदवारबाबत स्पष्टता करावी असे साकडे कार्यकर्त्यांकडून घातले जाण्याची शक्यता आहे.
हातकणंगले मतदारसंघातील प्रत्येक गावात डॉ. सुजित मिणचेकर आजही ते लोकसंपर्कात आहेत. मात्र राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि डॉ. मिणचेकर यांच्या उमेदवारीबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत आपण लढायचं हे ध्येय ठेवून त्यांनी संपर्क कायम ठेवला.
आता निवडणूक तोंडावर आली आहे त्यामुळे संभ्रमाचे चित्र दिसत आहे. ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्याला उमेदवारी असे सूत्र ठरले तर डॉ. मिणचेकर यांची अडचण होऊ शकते या पार्श्वभूमीवर भास्करराव जाधव यांच्या दौऱ्याकडे मिणचेकर यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.