चांद्रयान मोहिमेत सांगोला तालुक्यातील उद्योजक तरुणाचा हातभार

चांद्रयान 3 (Chandrayaan-3) ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आणि जगभरात भारताचे कौतुक झाले. सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटे झाली आणि देशभरात एकाच जल्लोष सुरु झाला. भारताच्या या मोहिमेमध्ये शेकडो शास्त्रज्ञ गुंतले होते. पण ही मोहीम यशस्वी करण्यामध्ये सांगोला तालुक्यातील एका उद्योजकाचे छोटेसे योगदान देखील होते. 

सांगोला तालुक्यातील खवासापूर येथील चंद्रशेखर भोसले या उद्योजकाने चांद्रयानात (Chandrayaan-3) वापरलेल्या सिल्वर आणि कॉपरपासून तयार केलेल्या ट्यूब बनवून दिल्या होत्या. यामुळे चांद्रयानाचे वजन कमी होण्यास मदत झाली आहे.  या ट्यूबमुळेच चांद्रयानाला वेळोवेळी देण्यात आलेले सिग्नल देखील व्यवस्थित पोहोचण्यास मदत झाली आहे. 

अत्यंत गरीब परस्थिती मधून आलेल्या चंद्रशेखर भोसले यांनी आपले  प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सांगोला येथे पूर्ण केले. चंद्रशेखर भोसले यांचे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे चांदीपासून इलेक्ट्रिक उपकरणे बनवण्याचा व्यवसाय आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते इस्त्रोला चांदी आणि कॉपर पासून बनवलेली विविध उपकरणे पुरवतात. चांद्रयान मोहिमेत देखील कॉपर आणि चांदी पासून बनवलेल्या 50 ट्यूब तयार करून त्या इस्त्रोला दिल्या आहेत. त्या सर्व ट्यूबचा वापर चांद्रयानामध्ये करण्यात आला आहे.

चंद्रशेखर भोसले यांचे आई-वडील आणि बंधू खवासपूर गावात शेती करतात. चांद्रयान मोहीम यशस्वी होताच सांगोला तालुक्यातून शेकडो नागरिकांनी चंद्रशेखर भोसले यांचे अभिनंदन केले आहे. 

बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनीटांनी इस्त्रोचे चांद्रयान लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आणि देशभरात एकच जल्लोष सुरू झाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. तर यशस्वी चंद्रमोहीम पार पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, चीन आणि रशियानंतर आता भारताचं नाव जोडलं गेलं आहे. 

चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरने चंद्रावर पहिलं पाऊल टाकल्यानंतर आता चंद्राच्या पृष्ठभागाचे चार फोटो पाठवले आहेत. इस्त्रोने हे फोटो त्यांच्या ट्विटरवरून शेअर केले आहेत. त्या आधी आपण आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचलो असल्याचा संदेश केला होता.