भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आज भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे. 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पंतने तीनही फॉर्मेटमध्ये 150 पेक्षा जास्त सामने खेळले असून अनेक संस्मरणीय विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे. टी-20 विश्वचषक 2024 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो महत्त्वाचा खेळाडू ठरला.
पंतचा जन्म 4 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तराखंडच्या रुडकी येथे झाला. मात्र त्याच्या करिअरची खरी पायाभरणी दिल्लीमध्ये झाली. त्या काळात उत्तराखंडमध्ये कोणतीही अधिकृत क्रिकेट असोसिएशन किंवा राज्यसंघ नव्हता. त्यामुळे पंतच्या कुटुंबाने त्याला लहान वयातच दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला. आई सरोज पंत यांची चिकाटी आणि कोच तारक सिन्हा यांचे मार्गदर्शन यामुळे त्याच्या प्रवासाला दिशा मिळाली.दिल्लीमध्ये ना नातेवाईक होते, ना आर्थिक सुबत्ता. त्यामुळे सरोज पंत आपल्या लहानग्या मुलासोबत दक्षिण दिल्लीतील प्रसिद्ध मोती बाग साहिब गुरुद्वार्यात आश्रय घेत. तिथेच ते राहायचे, लंगरमध्ये अन्न घ्यायचे आणि सकाळी सोनेट क्रिकेट क्लबमध्ये सरावाला जायचे. पंतच्या करिअरमागे या गुरुद्वार्याचा हातभार मोठा मानला जातो.
मोती बाग साहिब गुरुद्वारा ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. 1707 मध्ये गुरु गोबिंदसिंहजी यांनी येथे मुक्काम केला होता. असे मानले जाते की येथून सोडलेला त्यांचा बाण तब्बल आठ मैल दूर जाऊन बादशहा बहादुरशाहच्या पायाजवळ पडला होता. त्यामुळे या स्थळाला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे 2017 च्या आयपीएलदरम्यान पंतच्या वडिलांचे निधन झाले. केवळ 19 व्या वर्षी एवढा मोठा धक्का बसूनही त्याने दुसऱ्याच दिवशी मैदानात उतरून 57 धावांची खेळी केली. त्यानंतर ब्रिस्बेन, केपटाउन किंवा बर्मिंघम कुठेही असो, पंतने कसोटीत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर तो सव्वा वर्षातच परतला आणि 2024 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग झाला. ही जिद्दच त्याच्या खेळाडूवृत्तीचे खरे दर्शन घडवते.आजवर पंतने 47 कसोट्यांत 3427 धावा केल्या आहेत, ज्यात 8 शतके आणि 18 अर्धशतके आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 871 धावा असून टी-20 मध्ये त्याने 76 सामन्यांत 1209 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये 125 सामन्यांत 3553 धावा आणि 104 बळी अशी त्याची कामगिरी आहे.
