कोकण, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये शुक्रवार आणि शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. उत्तर कोकणापासून उत्तर दिशेला हवेची द्रोणीय रेषा तयार झाली आहे. जम्मू ते उत्तर पाकिस्तानपर्यंत पश्चिमी विक्षेप (थंड हवेची स्थिती) तयार आहे, त्यामुळे दक्षिण हरयानासह लगत परिसरात हवेच्या वरील स्तरात हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे.
आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा मध्य भारतात संयोग होऊन मध्य भारत, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नंदूरबारमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे येत असल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
राज्यात पुढील चार-पाच दिवस ढगाळ वातावरण राहून किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बुधवारी राज्यात जळगाव येथे १२.३ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे, ता रत्नागिरीयेथे ३३.५ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली.