MPSC कडून कधी जाहीर होणार वार्षिक वेळापत्रक? 2024मध्ये एकही परीक्षा नाही, २०२५चे वर्षाचे वेळापत्रकही गुलदस्त्यात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेळापत्रकानुसार २०२४ मध्ये एकही पूर्व परीक्षा झालेली नाही. फेब्रुवारी २०२४ मध्ये अपेक्षित असलेली महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता १ डिसेंबरला घेण्याचे नियोजित आहे.

हजारो रुपयांचा खर्च करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेल्याने त्यांनी आयोगावर नाराजी व्यक्त केली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२३ पासून परीक्षांच्या वेळापत्रकाचे पालन होत नसल्याची स्थिती आहे. २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रकही विस्कळीतच आहे. २०२४ या वर्षातील ११ महिने संपत असताना देखील आयोगाच्या माध्यमातून एकही पूर्व परीक्षा झालेली नाही.

त्यामुळे उमेदवारांचे अख्खे वर्ष वाया गेले आहे. आयोगाच्या जाहिरातीनुसार १ एप्रिल ही वयोगणनेची तारीख ग्राह्य धरली जाते.आयोगाकडून २०२५ चे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. २०२४ मधील उर्वरित पूर्व परीक्षा जानेवारी व फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार आहेत.

मात्र, २०२४ च्या परीक्षा उशिरा होत असल्याने २०२५ च्या परीक्षा तरी किमान आयोगाने एप्रिल २०२५ पासून घेण्यास सुरवात करावी, अशी उमेदवारांची मागणी आहे. दरम्यान, दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जाहीर होणारे आयोगाचे वार्षिक वेळापत्रक अजूनही जाहीर झालेले नाही. ते कधीपर्यंत जाहीर होईल, याबाबत आयोगातील वरिष्ठ गप्पच आहेत. वेळापत्रक लवकरच जाहीर होईल एवढेच उत्तर त्यांनी दिले.