पुढच्या काही दिवसात राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागणार आहे. त्याआधी मुंबईतील काँग्रेस नेत्याने एक मोठी मागणी केली आहे. “मला तुमच्या प्रश्नाच आश्चर्य वाटतं की, मी ज्यावेळी तीन वर्ष मुंबईचा अध्यक्ष होतो, तेव्हा माझा हाच स्टँड होता आणि माझा एकट्याचा नाही, मुंबईतील आमच्या सगळ्या नेत्यांचा हाच स्टँड आहे, काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजं” असं भाई जगताप म्हणाले. ते मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्ता हा आयुष्यभर पक्षाचा झेंडा घेऊन आपल्या वॉर्डात, जिल्हागटात, पंचायत समिती गटात, नगरपालिकेत फिरत असतो. त्याला एक अपेक्षा असते की, आपल्याला जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगर पालिका निवडणुकीत संधी मिळावी. स्वबळाची मागणी करण्यामागे असा विचार आहे” असं भाई जगताप म्हणाले.
“गेल्या आठवड्यात आमची मुंबई काँग्रेसची पॉलिटिक अफेअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला आमचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज रमेश चेन्नीथला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी जेव्हा आम्हाला विचारलं, त्यावेळी मी माझं मत सांगितलं. मुंबई महापालिका असो, जिल्हा परिषदा, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत. अशी मी माझी भूमिका मांडली. पॉलिटिक अफेअर कमिटीमधील बहुतेकांनी हेच मत मांडलं” असं भाई जगताप म्हणाले.
पक्षाची भूमिका आणि तुमची भूमिका एक आहे का? त्यावर भाई जगताप म्हणाले की, “मी पक्षाचा प्रमुख नसल्यामुळे मी माझं मत तुम्हाला सांगितलं. तुम्ही हव्या तशा गुगल्या टाकू नका. मुंबईचा अध्यक्ष असताना माझी भूमिका किंवा आत्ताची भूमिका यात कसलाही बदल झालेला नाही. निवडणुकीत कोणाबरोबर जावं आणि कोणाबरोबर जाऊ नये या बद्दल पक्षाचं हायकमांड निर्णय घेत असतं. आधी मी अध्यक्ष होतो आणि आता वर्षा गायकवाड आहेत. पक्षाची भूमिका ही पक्षाच्या प्रमुखांनी ठरवायची असते. परंतु आमची मतं विचारली जातात, तेव्हा मी माझं मत मांडलं” असं भाई जगताप म्हणाले.
