मनसेसाठी उद्धव सेना काँग्रेसची साथ सोडणार? राऊतांचे मोठे विधान

मत चोरी आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात विरोधी पक्षातील एकजुट दिसली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी त्यावर वज्रमुठ दाखवली. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच काँग्रेसने वेगळी चुल मांडली. मुंबईतील नेत्यांच्या वेगळ्या सूरांनी आघाडीतील बेसूर समोर आले. भाई जगताप यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेने सध्या काहूर उठले आहे. मनसेला सोबत घेण्यावरून वातावरण तापलेले दिसत आहे.

एरव्ही रोज महायुती आणि केंद्र सरकारवर संजय राऊत यांच्या आरोपांचे तोफगोळे उडतात. त्यांच्याकडील गोळाबारुदाने महायुतीची तटबंदी रोज हादरते. त्यांच्या गंभीर आरोपांचे पडसादही लागलीच उमटतात. राऊतांनी काँग्रेस नेत्यांच्या बदललेल्या भूमिकेवर मत व्यक्त केले.

मुंबई महापालिका अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मित्र पक्षाने वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आमच्याकडून आमच्या मित्र पक्षांना, सहकाऱ्यांना अडचणीत येणारी भूमिका घेणार नाही. वक्तव्य करणार नाही. राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांची स्वतंत्र भूमिका आहे आणि त्यांच्यामुळे कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर तोही त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे. अदानीच्या घशात मुंबई जाण्यापासून वाचवायची आहे. तर संयुक्त महाराष्ट्राच्यावेळी सर्व पक्ष एकत्र आले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी हा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. संयुक्त महाराष्ट्रावेळी सर्व पक्ष मतभेद विसरून एकत्र आले होते. बिहारमध्ये राज ठाकरे नाहीत. तरीही काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांचं वाजलं आहे. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. तरी त्यांच्यात जागा वाटपाचे भिजत घोंगडं आहे. तिथे राज ठाकरे अथवा उद्धव ठाकरे आहेत का? ठीक आहेत, अशी वक्तव्य होतात. पण मुंबई महाराष्ट्राच्या हातात असायला हवी ही आमची भूमिका आहे, असे राऊतांनी काँग्रेसला ठणकावले.