‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोची सूत्रसंचालिका आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत प्राजक्ता तिच्या खासगी आयुष्याविषयी आणि करिअरविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. तिने नुकतंच कर्जतमध्ये फार्महाऊस घेतलंय. हे कसं शक्य झालं आणि कर्जतमध्ये फार्महाऊस का घेतलं, हेसुद्धा तिने सांगितलं आहे. याच मुलाखतीत प्राजक्ता तिचं लग्न, पार्टनर, प्रेम, हृदयभंग याबद्दलही व्यक्त झाली. लग्नाबद्दल आपले काय विचार आहेत, तेसुद्धा तिने सांगितले.आयुष्यातील स्थिरतेचं महत्त्व सांगताना प्राजक्ता पार्टनरबद्दल म्हणाली, “जर माझी मानसिक शांती पणाला लागत असेल, तर मला लग्न करायचं नाही. माझ्या आयुष्यातील शांतता ही फार महत्त्वाची आहे.
कारण स्वातंत्र्यासाठी काही स्थान नसेल, तर तुम्ही काहीच मोकळेपणे करू शकणार नाही. तुमच्या आयुष्याचा जोडीदार हा तुमचं सर्व आयुष्यच बदलू शकतो. तुमची राहण्याची पद्धत, भविष्य, मानसिक स्वास्थ्य.. सगळंच बदलतं. त्यामुळे मला लग्न म्हणजे हा मोठा रिस्कच वाटतो. प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा हे कोणत्याही नात्यात खूप महत्त्वाचे असतात. सध्याच्या काळात कायम आपल्यासोबत राहणारं असं काही शोधणं अशक्यच झालं आहे. जर एखादं नातं प्रामाणिक असेल, तर ते टिकून राहतं.”
प्रेमात आलेल्या अनुभवांविषयी प्राजक्ता पुढे म्हणाली, “मी प्रेमात पडले. मी प्रेमाचा अनुभव घेतलाच नाही अशातला भाग नाही. पण नंतर मला समजलं की हे कायमचं राहणार नाही. तेव्हा मी त्यातून बाहेर पडले. पाच वर्षांपूर्वी एका नात्यात मीच म्हणाले होती की आता इथेच थांबू. तो माझ्याशी खोटं बोलायचा. मी त्याला खोटं बोलताना पकडलं होतं. त्याला ती चूक कधीच स्वीकारायची नव्हती. सत्य बोलण्यासाठी धाडस लागतं.”
श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमातील एका सत्संगादरम्यान प्राजक्ताने त्यांना लग्नाविषयी प्रश्न विचारला होता. “शादी करना सबके लिए कंपल्शन्स है क्या?,” असा सवाल तिने केला होता. त्यावर श्री श्री रविशंकर म्हणाले, “अशी गरज असती तर माझ्या बाजूला कधीच एक अजून खुर्ची लागलेली असती किंवा डबल सोफा लावण्याची गरज असती. अशी काही गरज नाही. आनंदी राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही लग्न करून आनंदी राहा किंवा एकटं राहून आनंदी राहा. काही लोक लग्न करूनही दु:खी असतात किंवा एकटे राहूनही दु:खी असतात.”