इचलकरंजीत घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर साठा व विक्री करणाऱ्या दोघांवर शिवाजीनगर पोलिसांची कारवाई — दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

शिवाजीनगर पोलिसांनी इचलकरंजी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या आणि मशीनच्या साहाय्याने गॅस भरण्याचा व्यवसाय करणाऱ्या दोन जणांविरुद्ध कारवाई केली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये मिळून रु. १.४६ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहिल्या कारवाईत षटकोन चौक परिसरात उत्तम आण्णासो पाटील (वय ४०, रा. षटकोन चौक, इचलकरंजी) याने कोणताही अधिकृत परवाना नसताना घरगुती वापराचा ज्वलनशील गॅस सिलेंडर साठवून ठेवले होते. मशीनच्या सहाय्याने मोठ्या टाकीतून लहान टाक्यांमध्ये प्रतिकिलो ८० रुपये किलोप्रमाणे गॅस भरून विक्री केली जात असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. या ठिकाणाहून ९ भरलेल्या, ५ रिकाम्या, १ अर्धवट टाकी, दोन वजनकाटे, दोन इलेक्ट्रिक मोटर, व इतर साहित्य असा एकूण रु. ५९,३५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पो.हे.कॉ. सुर्यवंशी करीत आहेत.

दुसऱ्या कारवाईत, डेक्कन चौकाजवळील पत्र्याच्या दुकानात चरण सुरेश सुतार (वय ३२, रा. शिवाजीनगर, कोरोची) हा बेकायदेशीररीत्या गॅस सिलेंडरचा साठा करून मशीनद्वारे भरण्याचे काम करत असल्याचे पोलिसांनी आढळल्याने टाकलेल्या छाप्यातून १३ भरलेल्या, ७ रिकाम्या सिलेंडर टाक्या, दोन वजनकाटे, दोन इलेक्ट्रिक मोटर व इतर साहित्य असा एकूण रु. ८७,०५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून तपास सहाय्यक फौजदार आबिटकर करीत आहेत.ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.