सांगोल्यात पुन्हा मीच आमदार होणार……

सध्या निवडणुकीचे वारे जोर देत आहे. सगळीकडे मोर्चेबांधणीस पक्षांनी सुरुवात ही केलेली आहे. काय झाडी, काय डोंगर ही कॉल रेकॉर्डींग व्हायरल झाल्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील चांगलेच चर्चेत आले होते. आता आगामी निवडणुकींच्या तोंडावर पुन्हा एकदा शहाजी बापू पाटील यांचं नाव चर्चेत आलंय.

सांगोल्यात पुन्हा एकदा मीच आमदार होणार, असा दावा शहाजी बापू पाटलांनी केलाय. मी आमदार आहेच, पुढे पण मीच आमदार राहणार. पण माझ्यासोबत दीपक साळुंखे हे देखील आमदार होतील असे विधान सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज सांगोल्यात केलं. दीपक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत कार्यक्रमात आमदार पाटील यांनी हे विधान केलं आहे.

माजी आमदार राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे आमदार पाटील आणि साळुंखे हे आमने सामने येणार का? या विषयी चर्चा सुरू आहेत. असे असतानाच आता आमदार शहाजी बापू पाटील यांनी यापुढे देखील मीच आमदार राहणार असा दावा केला.

शहाजी बापू पाटील यांनी यावेळी माझ्याबरोबरच दीपक साळुंखे यांना‌ देखील आमदार करणार असं, आश्वासन दिलं आहे. दीपक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार निलेश लंके आदी उपस्थित होते.

राज्यातील सत्तासंघर्षात अजित पवार गट भाजप शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून लढण्याची तयारी सुरू आहे. अशात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी सांगोल्यातून विधानसभा निवडणुक लढण्याची घोषणा केली. तसेच ब्रम्हदेव जरी आला तरी मी सांगोल्यातून विधानसभेची निवडणूक लढवणार असं त्यांनी म्हटलं. त्यात आता शहाजी बापू पाटील यांनी देखील दावा केल्याने नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.