सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का?

सांगोला तालुका हा दुष्काळ भाग म्हणून जग जाहीर आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना खूपच नुकसान देखील सहन करावे लागते. सांगोला तालुक्यात डाळिंबाच्या बागा आता नष्ट होत चाललेल्या आहेत आणि दुधाचे दर कमी झालेले असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रश्न उद्भवत आहेत.

शेतकऱ्यांच्या याच प्रश्नावर चर्चा करण्यासाठी स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन विविध मुद्द्यावर चर्चा केली.

शेतकऱ्यांचे हे प्रश्न लवकरच सोडवले जातील असे आश्वासनही पवारांनी डॉ. बाबासाहेबांना दिले. दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे.या अगोदरच रोगामुळे डाळिंब बागा नष्ट होत असल्यामुळे तालुक्याचे अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे.

सध्या शेतकरी डाळिंबाच्या बागा नष्ट होत असल्याने दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे. परंतु दुधाचे दरही कमी झाल्याने व त्यातच दुष्काळी परिस्थिती तालुक्यावर ओढवल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शरद पवार हे माढ्याचे खासदार असताना त्यांनी डाळिंबासाठी विविध अनुदान दिले होते.

सांगोला तालुक्यातील डाळिंबाच्या बागा नष्ट होत असताना देखील कोणत्याही प्रकारचे अनुदान सरकार देत नाही. येणाऱ्या या पुढील काळात तालुक्यामध्ये पाण्याचीही तीव्र टंचाई निर्माण होणार असून त्यासाठीच्या विविध उपयोजना करणेही गरजेचे आहे.याबाबत सविस्तर चर्चा डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शरद पवार यांच्याशी केली.

तालुक्यातील प्रश्नासाठी व विशेषतः डाळिंबाच्या अनुदानासाठी सरकारचे लक्ष वेधून शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जाईल, असे आश्वासनही शेवटी शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब देशमुख यांना दिले. या बैठकीवेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड उपस्थित होते.