ऊस वाहतूक ट्रॅक्टरला मागून धडक! टेम्पो चालक ठार, दोघे जखमी

अलीकडच्या काळात अपघातांचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. अपघातामुळे अनेकांना प्राणही गमवावे लागले आहे. मालवाहतूक टेम्पोने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने टेम्पो चालक ठार झाला.भाऊसाहेब नाना लोंढे ( वय ४३, रा. भडकंबे, ता. वाळवा, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे. या अपघातात अन्य दोघे जखमी झाले. शुभम महादेव पोळ व ओंकार सर्जेराव माने (दोघेही रा. नागाव, ता. वाळवा, जि. सांगली) अशी जखमींची नावे आहेत.

पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथील बिरदेव मंदिर समोर काल रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, भाऊसाहेब लोंढे हे आपला मालवाहतूक टेम्पो (एमएच ०९ सीए ८१३४) घेऊन शिरोली एमआयडीसीकडून पुण्याच्या दिशेने निघाले होते. शुभम पोळ व ओंकार माने हेदेखील त्यांच्या टेम्पोतून प्रवास करत होते.

सहापदरीकरणासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूपट्ट्या उकरलेल्या असतानाही टेम्पोचालक लोंढे हे भरधाव वेगाने निघाले होते. टोप येथील बिरदेव मंदिरासमोर त्यांच्या टेम्पोने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीस मागील बाजूने जोराची धडक दिली. या धडकेमध्ये भाऊसो लोंढे गंभीर जखमी झाले. शुभम पोळ व ओंकार माने हेही जखमी झाले.

जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र टेम्पोचालक भाऊसाहेब लोंढे हे मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताची नोंद आज शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.