वाळवा येथे धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे नेते गौरव नायकवडी यांनी एकजूट उभारून चळवळ सुरू ठेवली आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे २८ एप्रिल २०२४ रोजी निर्धार मेळाव्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, त्यांच्या पुनर्वसनाच्या मागण्या मान्य व्हाव्यात, गेली ४० वर्षे सुरू असलेला हजारो धरणग्रस्तांचा लढा थांबावा, यासाठी डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर १० ऑक्टोबर २०२४ रोजी शिंदे यांनी प्रत्यक्ष महामंडळ स्थापनेबाबत घोषणा केली.
या महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरातील साडेदहा लाख प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचा फायदा व्हावा, हा मूळ उद्देश आहे. मात्र घोषणेप्रमाणे महामंडळाच्या स्थापनेशिवाय प्रत्यक्षात इतर काहीही कार्यवाही झालेली नाही. सरकारने या महामंडळाचे अध्यक्ष, कर्मचारी आणि त्यांची कार्यप्रणाली जाहीर करणे गरजेचे आहे. नुकतेच वारणावती येथे कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली धरणग्रस्तांनी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली ४९ दिवस संघर्ष केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलेल्या आश्वासनामुळे पंधरा दिवस आंदोलन थांबविले आहे.
राज्य सरकारकडून नागनाथअण्णा नायकवडी सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकास महामंडळाची घोषणा झाली, मात्र प्रत्यक्षात गेल्या चार महिन्यांत महामंडळाच्या स्थापनेबाबत काहीही हालचाली नसल्यामुळे धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अभयारण्यग्रस्त जनतेला न्यायापासून वंचित रहावे लागत आहे. तातडीने या महामंडळाबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी होत आहे.