राजमाता जिजाबाई भोसले यांच्या आयुष्यावर आधारित येणार चित्रपट

राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले… यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली. पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली.

प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने स्त्रीशक्ती आणि मातृशक्तिचं चिरंतन उदाहरण सर्वांना दिलं. जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटात जिजाऊंची भूमिका अभिनेत्री तेजस्विनी पंडित साकारणार आहे.

या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं असून त्यात राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा दिसत आहे. 6 फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करत आहेत.