सोलापुरातील महाराष्ट्र- सौराष्ट्र रणजी सामन्याची हुकली संधी!

महाराष्ट्रविरूद्ध मणिपूर रणजी सामन्यानंतर सोलापूरच्या भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर महाराष्ट्रविरूद्ध सौराष्ट्र हा रणजी सामना घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र, सोलापुरातील पंचतारांकित हॉटेल हाऊसफुल्ल असल्याने ही संधी हुकली असल्याची माहिती सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी चंद्रकांत रेंबुर्से यांनी दिली.

स्मार्ट सिटीतून पार्क स्टेडिअमचा चेहरा- मोहरा बदलला आहे. मैदान व मैदानावरील खेळपट्टी अतिशय उत्कृष्ट असल्याचा अभिप्राय मणिपूर व महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंनी नोंदविला होता. महाराष्ट्रविरूद्ध मणिपूर हा रणजी सामना तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र संघाने जिंकला होता.

आता यंदाच्या रणजी मालिकेतील दुसरा सामना २ फेब्रुवारीपासून सोलापूरकरांना पाहण्याची संधी मिळणार होती. त्यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने प्रयत्न केले होते. त्यांना यशही मिळाले, पण हॉटेल उपलब्ध नसल्याने हा सामना आता रायगड, पुणे किंवा छत्रपती संभाजी नगर येथील मैदानावर खेळविला जाणार आहे.