सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात सुरु आहे. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी होम प्रदिपन सोहळा अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेत प्रतिकात्मक विवाह सोहळा होतं असतो. यात्रेच्या पहिल्या दिवशी तैलभिषेक, दुसऱ्या दिवशी अक्षता अर्थात विवाह सोहळा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी होम प्रदिपन सोहळा होतं असतो.
यामध्ये बाजरीच्या पाच पेंड्यांना साडी, चोळी, खण आणि मंगल चिन्हाचा वापर करुन कुंभार कन्येचे रुप देण्यात येते. त्यानंतर मानकरी हिरेहब्बू यांच्या हस्ते पुजा करुन हा होमप्रदीपन विधी पार पडतो. त्यापूर्वी मानाच्या सातही नंदीध्वजांची मिरवणूक निघाली. तिसऱ्या दिवशीच्या मिरवणूक वेळी नंदिध्वजना विद्युत रोषणाईने सजवले जाते. तर मानाच्या पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधण्यात येतो. मानकरी असलेले सोमनाथ मेंगाने हे एकटेच मानाचे पहिले नंदीध्वज उचलून होम मैदान पर्यंत आणतात. मानाचे नंदिध्वज होम कट्याजवळ आल्यानंतर हिरेहब्बू बंधूनी प्रतिकात्मक कुंभार कन्येची विधीवत पूजा केली. त्यानंतर अग्नी देत होम विधी पूर्ण केला. या सोहळ्याला काशी पिठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य हे देखील उपस्थित होते.
श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या तिसऱ्या दिवशी होम प्रदिपन सोहळा पार पडल्यानंतर रात्री उशिरा भाकणुकीचा कार्यक्रम पार पडतो. मानकरी असलेल्या देशमुख यांचे वासरू दिवसभर उपाशी ठेवण्यात येते. दिवसभर उपाशी असलेल्या हा वासरासमोर गूळ, गाजर, बोरं, खोबरं, खारीक, पान, सुपारी आणि विविध प्रकाराचे धान्य ठेवण्यात येते. वासरूच्या हालचालीवरुन मानकरी हिरेहब्बू हे पुढील वर्ष कसं असेल याचा अंदाज व्यक्त करतात. याकडे संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष असते.
यंदाच्या वर्षी वासरू हे अत्यंत शांत होते. सुरुवातीला वासराने मलमूत्र केले. तसेच गाजराला स्पर्श केले मात्र खाल्ले नाही. वासराच्या या हालचालीवरून 2024 चे हे वर्ष स्थिर असेल, महागाई वाढणार नाही. तसेच मुबलक प्रमाणात पाऊस असेल असा अंदाजे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केला. दरम्यान ‘मागच्या वर्षी वासरू हे बिथरलेले होते. त्यावरून मोठे संकट असल्याचे अंदाज मी व्यक्त केला होता. जगाने मोठे युद्ध या वर्षी पाहिले. तसेच यंदाचे वर्ष जरी राजकीय निवडणुकांचे असले तरी या भाकणुकीत राजकीय कोणताही अंदाज व्यक्त करता येतं नाही” अशी प्रतिक्रिया देखील मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली.